Pune News : ‘समाज कल्याण’च्या आवारात झिंगझिंग झिंगाट; कर्मचारी, खासगी व्यक्तींनी बनवला दारू अड्डा | पुढारी

Pune News : 'समाज कल्याण'च्या आवारात झिंगझिंग झिंगाट; कर्मचारी, खासगी व्यक्तींनी बनवला दारू अड्डा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या मुख्यालयाचे आवारच मद्यपींचा अड्डा बनले आहे. ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या या आवारातील संत ज्ञानेश्वर वसतिगृहाच्या पाठीमागील बाजूला मद्यपींनी दारू पिऊन टाकलेल्या बाटल्यांचा खच पडल्याचे आढळून आले.
काही महिन्यांपासून कार्यालयातील कर्मचार्‍यांसह बाहेरच्या व्यक्तींनी दारूच्या पार्ट्या करून या विभागाचे आवार ’ झिंगझिंग झिंगाट ‘ करून टाकले आहे.

समाज कल्याण विभागाच्या लगतच पुण्याचे पोलिस आयुक्तालय आहे. त्यालगत मैदान आहे. त्यामुळे बंद असलेल्या वसतिगृहाच्या पाठीमागे मद्यपींना मोकळे रान असते. सायंकाळनंतर अनेक मद्यपी तेथे येतात. दारूच्या बाटल्या रिचवून निघून जातात, अशी माहिती नागरिकांनी, तसेच कर्मचार्‍यांनी दिली.

समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी आणि अधिकारी काम संपवून घरी गेल्यानंतर साधारणपणे संध्याकाळच्यावेळी या विभागाचे आवार पूर्णत: मोकळे असते. याच विभागाच्या मागील बाजूस बंद असलेले वसतिगृह आहे. या वसतिगृहाच्या बाहेर वाहन पार्किंगसाठी जागा आहे. याच जागेत राजरोजपणे दारूचा अड्डा सुरू असतो. रात्री उशिरापर्यंत या भागात खासगी व्यक्ती ‘चोरी चुपके’ प्रवेश करून दारू पित असल्याचे दिसून आले आहे.

मात्र, याबाबत भीतीपोटी कोणीही सांगण्यास पुढे येत नसल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. दरम्यान, या कार्यालयाच्या आवारात दारूच्या पार्ट्या करणार्‍यांमध्ये काही कर्मचारीदेखील सहभागी असल्याचे दिसून आले आहे. मद्यसेवन करणार्‍या कर्मचार्‍यांबरोबर त्यांचे ‘ सख्खे मित्र’ (खासगी नागरिक) देखील या पार्ट्यात उपस्थित राहून झिंगाट होतात. याबाबत समाज कल्याण विभागाचे आयुक्त नक्की कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

कचर्‍याखालीही बाटल्या

समाज कल्याण विभागाच्या बंद असलेल्या वसतिगृहाच्या मागील मोकळ्या जागेत दारू आणि पाण्याच्या मोकळ्या बाटल्यांचा ढिगारा आढळला. कचर्‍याखालीही बाटल्या दिसून आल्या.

राज्य शासनाने अनुसूचित जातींच्या प्रगतीसाठी समाज कल्याण विभाग सुरू केला. त्याच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्याच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात मद्यपी दारू पिऊन घालत असलेला गोंधळ हा प्रकार घृणास्पद आहे. याबाबत आयुक्तांनी लक्ष घालून हा प्रकार थांबवावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारावे लागेल.

– महेंद्र कांबळे,
माजी शहराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)

हेही वाचा

कीर्तन-प्रवचन परंपरेचा सूर हरपला!

शरीफ यांची घरवापसी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परीक्षेत गैरप्रकार वाढले

Back to top button