कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परीक्षेत गैरप्रकार वाढले | पुढारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परीक्षेत गैरप्रकार वाढले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्र परीक्षेत सहा दिवसांत सुमारे 164 गैरप्रकार आढळले आहेत. भरारी व बैठे पथकाकडून धडक कारवाई होत असल्याने गैरप्रकार उघडकीस येत आहेत.

विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वतीने हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 24 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. सध्या 44 अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असून 43 हजार 807 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी तीन भरारी पथके नियुक्त केली आहेत.

20 महाविद्यालयांत बैठे पथक स्थापन केले असून यात सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भरारी पथकाने आजअखेर सुमारे 164 कॉपी प्रकरणे पकडली आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर नियमानुसार परीक्षा प्रमाद समितीकडून परीक्षा प्रतिबंध, दंड अशी कारवाई केली जाणार आहे. परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.

एकाच दिवसात 75 कॉपी प्रकरणे

विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षेंतर्गत गुरुवारी (दि.26) कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात पथकाकडून सांगली-18, कोल्हापूर-34, सातारा-23 असे तिन्ही जिल्ह्यांतून मिळून 75 गैरप्रकारांची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आली आहे.

Back to top button