Lalit Patil Drug Smuggler : ललित पाटीलला पळवण्यात अर्‍हानाचा हात; पाटीलला मॅनेजरच्या कार्डद्वारे मदत | पुढारी

Lalit Patil Drug Smuggler : ललित पाटीलला पळवण्यात अर्‍हानाचा हात; पाटीलला मॅनेजरच्या कार्डद्वारे मदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याची विनय अर्‍हाना याच्याशी ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ओळख झाली. त्यानंतर, पाटील याला पळून जाण्यासाठी विनय आर्‍हानाने त्याच्या वाहनावरील चालक असलेल्या दत्तात्रय डोकेमार्फत आर्थिक मदत केली. ही मदत त्याने मॅनेजर अश्विन कामत याच्या एटीएमद्वारे केली असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

भूषण अनिल पाटील (वय 34), अभिषेक विलास बलकवडे (वय 31, रा. दोघेही नाशिक ) यांना ड्रग्स तस्करीच्या गुन्ह्यातून ललित पाटील फरार झाल्या प्रकरणी गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. तर दुसरीकडे सक्तवसुली संचालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय विवेक अर्‍हाना (वय 50) याला बुधवारी तळोजा जेलमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

गुरुवारी (दि. 26) तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटील हा रुसून रुग्णालयात वार्ड क्र 16 मध्ये उपचार घेत असतांना भूषण पाटीलने 29 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेतली होती. तर अभिषेक बलकवडे याने 30 सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटील का पळविले असल्याचे तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयाला सांगितले. यावेळी, न्यायालयाने तिघांना 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे म्हणाल्या, विनय अर्‍हाना याने कोणत्या कारणांसाठी तसेच कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटीलची मदत केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संगमत करून कट रचला असून तो कशा प्रकारे रचला आणि कुठे रचला आहे याचा तपास करायचा आहे. त्यासाठी अर्‍हाना सह पाटील व बलकवडेला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. नीलिमा यादव-इथापे यांनी केली.

त्यास अर्‍हाना यांच्या वतीने अ‍ॅड. भाग्यश्री सोतूर यांनी विरोध केला. अर्‍हाना हे न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयीन कोठडीत असतांना ते ड्रायव्हर आणि मॅनेजरला ललित पाटीलची मदत करा हे कसे काय सांगू शकतात. तसेच ललित पाटील पळून गेल्यानंतरही अर्‍हाना हे पुढचे 4 दिवस ससून रुग्णालयात वार्ड क्र 16 मध्ये होते. त्यावेळी पोलिसांनी का चौकशी केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तर भूषण आणि अभिषेक बलकवडे यांच्या वतीने संदीप बाली यांनी बाजू मांडली.

कामतला ताब्यात का घेतले नाही?

अर्‍हानाचा मॅनेजर अश्विन कामत याचा या प्रकरणात सहभाग दिसून येत असतांना त्याला आतापर्यंत ताब्यात का घेतले नाही असा प्रश्न न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांना विचारला. त्यावर याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुन्ह्यात ज्यांचा सहभाग असेल त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे तपासी अधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले.

भूषण पाटीलला न्यायालयात भोवळ

भूषण पाटील याला गुरुवारी न्यायालयात बुरखा घालून दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालय कक्षातील आरोपीच्या टेबलावर बसल्यानंतर पाटीलला भोवळ आल्याने तो टेबलावरून खाली पडला. यादरम्यान, त्याला कोर्ट रूमच्या बाहेर नेण्यात आले.

हेही वाचा

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी ठाण्यात साखळी उपोषण

तीन वर्षांनंतर सरकार पडले तर सर्वपक्षीय सरकार स्थापावे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे ‘क्रीडा पर्यटना’ला चालना : पंतप्रधान मोदी

Back to top button