राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे ‘क्रीडा पर्यटना’ला चालना : पंतप्रधान मोदी | पुढारी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे ‘क्रीडा पर्यटना’ला चालना : पंतप्रधान मोदी

विशाल नाईक

मडगाव ः भारतीय खेळांच्या महाकुंभाची महासभा आज गोव्यात येऊन पोचली आहे. गोव्याच्या हवेत रंग, तरंग आणि रोमांच पसरला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निर्माण करण्यात आलेल्या साधनसुविधांचा लाभ कित्येक दशके येथील क्रीडापटूंना घेता येईलच. पण, या स्पर्धेमुळे पर्यटनक्षेत्रालाही चालना मिळून गोव्याची अर्थव्यवस्थाही बळकट होणार आहे. भारत देश 2030 मध्ये ‘यूथ ऑलिम्पिक’ आणि 2036 मध्ये ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयार आहेच. गोव्यातही आगामी काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले, तर राज्यात क्रीडा विकास झपाट्याने होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. गोव्याची क्रीडापटू कात्या कोयेलो हिच्या हस्ते स्पर्धेची ज्योत स्वीकारून मोदी यांनी स्पर्धांचा अधिकृतरीत्या प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. गोव्यासारख्या राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे हे अभिमानास्पद बाब आहे. सत्तर वर्षांत जे घडले नाही ते यावेळी आशियाई स्पर्धेत घडले आहे. एशियन पॅरा स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये भारताने नवा इतिहास रचला. ही स्पर्धा नवीन खेळाडूंसाठी नवे व्यासपीठ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतातील गावागावांत गुणवत्तेची कमतरता नाही. तरीही आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदकांपासून फार दूर होतो. 2014 नंतर आम्ही देशाच्या समस्या विकासाच्या संकल्पनेतून दूर केल्या. क्रीडा क्षेत्रातही बदल घडवले, निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणली. खेळाडूंना आर्थिक मदत देण्याबरोबर प्रशिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या.

या सरकारने क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तीन टक्क्यांनी तरतूद वाढवली. शाळा ते विद्यापीठ स्तरापर्यंतच्या उत्कृष्ट खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या प्रशिक्षण आणि सकस आहारावर सरकार मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडीएम’ योजनेंंतर्गत खेळाडूंना जगातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत देशभरातील 3 हजार खेळाडूंचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना दरवर्षी सहा लाख रुपयांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती दिली जातेे. यापूर्वी खेळाडूंच्या प्रतिभेला नवे आयाम मिळत नव्हते. त्यांनी 36 पदके आशियाई स्पर्धेत जिंकली हे या नव्या योजनेच फलित आहे. भारत आज जगात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून ‘माय भारत’ योजनेच्या माध्यमातून युवा वर्गाला जोडले जाणार आहे. जेणेकरून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी जास्तीत जास्त संधी त्यांना मिळणार आहे.

घुमट वाद्य देऊन सन्मान…

31 ऑक्टोबरला ‘एकता दिना’चे निमित्त साधून ‘माय भारत’ अभियान संकल्पना सुरू होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘एक भारत, श्रेष्ठ भारता’चे प्रतीक आहे. 2030 मध्ये ‘युथ ऑलिम्पिक’ आणि 2036 मध्ये ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत तयार आहे. 2036 मध्ये भारत जगातील अग्रणी आर्थिक शक्तीशाली देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. भारत देश आधुनिक साधनसुविधांवर शंभर लाख कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याचे पारंपरिक घुमट वाद्य देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल श्रीधरन पिल्लई, ऑलिम्पिक संघेटनेच्या अध्यक्ष पी.टी. उषा, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, सभापती रमेश तवडकर, बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार विजय सरदेसाई व मान्यवर उपस्थित होते.

‘ते आले, त्यांनी जिंकले…!’

‘ते आले, त्यांनी पहिले आणि त्यांनी जिंकले.’‘मोदी.. मोदी…’च्या जयघोषात खचाखच भरलेल्या फातोर्डातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हजारो गोवेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. स्टेडियमवर पंतप्रधानांनी ‘स्वयंपूर्ण फेरी’तून फेरफटका मारत गोमंतकीयांना हात उंचावून अभिवादन केले. नंतर गोमंतकीयांनी मोबाईलची टॉर्च लावून उत्स्फूर्त दाद दिली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या साधनसुविधांचा वापर आगामी काळात विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी केला जाईल. त्याचा राज्याच्या आर्थिक व्यवस्थेसाठीही उपयोग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे गोवा प्रगतिपथावर वाटचाल करण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाईल.

– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

Back to top button