ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारने 42 दिवस उलटले तरी आरक्षण दिले नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आतापर्यंत विक्रमी 58 मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेने आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला. तरी देखील सरकारने टिकणारे आरक्षण दिले नाही. म्हणून जालना येथील अंतरवाली सराटीचे मावळे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह सर्व मंत्रिमंडळ गेले आणि आरक्षणासाठी 30 दिवसांची मुदत मागून घेतली. त्यांना मुदत देताना पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली. मुदत संपली तरी राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पूर्ण केली नाही. त्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील मराठ्यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज झालेल्या सकल मराठा समजाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी रमेश आंब्रे, कृष्णा पाटील, सुहास देसाई, दत्ता चव्हाण, विक्रम खामकर, अड. संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव, लालचंद जाधव, नंदू शिंदे, तुकाराम आंब्रे, दिनेश पवार, चंद्रशेखर पवार, डॉ. पांडुरंग भोसले, संजय जाधव, सचिन पाटील, सागर भोसले यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.