Pune School News ; संपर्क केंद्रांची मक्तेदारी संपुष्टात | पुढारी

Pune School News ; संपर्क केंद्रांची मक्तेदारी संपुष्टात

गणेश खळदकर

पुणे : सतरा नंबरचा अर्ज भरायचा आहे संपर्क करा… अशा संपर्क केंद्रांच्या गल्लीबोळात दिसणार्‍या पोस्टर, फ्लेक्स, जाहिरातींना आता कायमचा आळा बसणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून दहावीचे सतरा नंबरचे अर्ज संपर्क केंद्रांऐवजी कोणत्याही शाळेमार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सतरा नंबर अर्जाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होत असलेली लूट थांबणार असून, संपर्क केंद्रांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) दरवर्षी फेब—ुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेला नियमित विद्यार्थ्यांबरोबरच सतरा नंबरचे अर्ज भरून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचादेखील समावेश असतो. त्यासाठी राज्य मंडळामार्फत काही संपर्क केंद्रांची निर्मतिी करण्यात आली होती. या संपर्क केंद्रांच्या माध्यमातूनच फक्त दहावीचे सतरा नंबरचे अर्ज भरून घेतले जायचे, तर बारावीसाठी सतरा नंबरचा अर्ज मात्र कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयातून भरता येत होता.

यंदापासून मात्र राज्य मंडळाने बारावीसारखेच दहावीसाठीदेखील कोणत्याही शाळेतून विद्यार्थ्यांना सतरा नंबरचा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावीचे सतरा नंबरचे अर्ज भरण्यासाठी ठरावीकच संपर्क केंद्रे होती. यातील काही संपर्क केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अर्ज भरणे तसेच उत्तीर्ण होण्यासाठी मदत अशा प्रकारची आमिषे दाखवून विद्यार्थ्यांची लूट केली जात असे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जात होती.

विद्यार्थीदेखील याला बळी पडून हवी ती रक्कम देण्यास तयार होत असत. त्यामुळे संपर्क केंद्रांची मक्तेदारी वाढली होती. तर विद्यार्थ्यांनादेखील ते राहत असलेल्या ठिकाणांपासून संपर्क केंद्रे जिथे आहेत तिथपर्यंत जाण्याची वेळ येत असे. या सर्व गोष्टींना आता आळा बसणार आहे. त्यामुळे सतरा नंबर अर्जाच्या नावाखाली काही शिक्षक आणि शाळांची जी दुकानदारी सुरू होती ती आता कायमची संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सतरा नंबरचा अर्ज शाळेच्या माध्यमातून भरता येईल. एका शाळेला जास्तीत जास्त 50 विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येतील. विद्यार्थ्यांना रहिवाशी दाखल्यासह राज्य मंडळाच्या अन्य अटींचे पालन करावे लागेल. संपर्क केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारी कमी संधी तसेच काही संपर्क केंद्रांकडून विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे.

– शरद गोसावी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

हेही वाचा

Rohit Pawar : रोहित पवार विद्यापीठात फिरकलेच नाहीत

Lalit Patil : ललितचा जोडीदार गोलू करायचा ड्रगची वाहतूक, व्यापार अन् विक्री

Dalip Tahil Jail : अभिनेता दलीप ताहिल यांना तुरुंगवासाची शिक्षा!

Back to top button