Rohit Pawar : रोहित पवार विद्यापीठात फिरकलेच नाहीत

Rohit Pawar : रोहित पवार विद्यापीठात फिरकलेच नाहीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून अनेक विद्यार्थी संघटना आमदार रोहित पवार यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे आणि तरुणांचा आवाज म्हणून पाहत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पवार भेटण्यासाठी येणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सायंकाळी 5 पासून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या आदर्श कॅन्टीनसमोर गर्दी केली होती. मात्र, रोहित पवार विद्यापीठात फिरकलेच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली.

रोहित पवार विद्यापीठात येणार असल्याने शहारातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यापीठात आले होते. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात गर्दी केली होती. विद्यापीठातील काही कर्मचारीसुद्धा रोहित पवार येणार म्हणून वाट पाहत उभे होते.

सर्व अभ्यास व काम सोडून विद्यार्थी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत विद्यापीठ परिसरात थांबले होते. त्यानंतर शरद पवार गटात असणार्‍या पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका आणि काही कार्यकर्ते येथे आले. रोहित पवार हे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आहेत. मात्र, एकाही अधिसभेच्या बैठकीस ते उपस्थित राहिले नाहीत. 28 ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक होणार आहे. या बैठकीस रोहित पवार उपस्थित राहणार आहेत का ? अशी चर्चा विद्यार्थी करताना दिसून आले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुर्‍याशा प्रमाणात वसतिगृह उपलब्ध होत नाहीत.

जेवणात सातत्याने अळी व झुरळ आढळून येतात. बार्टी, सारथी आदी संस्थांकडून विद्यार्थ्यांना पीएच. डी.साठी फेलोशीप उपलब्ध होत नाही,असे अनेक प्रश्न घेऊन विद्यार्थी आले होते.मात्र, रोहित पवार येणार नसल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी निराश मनाने काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले.

'फडणवीस खोटं बोलतात!'

शिंदे सरकारने अध्यादेश काढला आणि त्यांच्याच सरकारने रद्द केला. सगळे अध्यादेश त्यांच्याच सरकारने काढले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असते तर त्यांनी त्यांना लगेच सांगितले असते की देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलत आहात. देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. पण ते आता खोटे जास्त बोलत आहेत, अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

पुण्यामध्ये शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. सगळा महाराष्ट्र भिकारी झाला तरी मी होणार नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले होते. एवढा अहंकार या मंत्र्यांना आहे, असा घणाघातही रोहित पवार यांनी केला आहे.

ससूनच्या रॅकेटमध्ये तुमचाही हात

ससूनचे अधिष्ठाता (डीन) डॉ. संजीव ठाकूर यांना ललित पाटील हा किती दिवसांपासून ससूनमध्ये उपचार घेत आहे याची माहिती नसल्याचे सांगतात. एखादा रुग्ण एवढ्या दिवसांपासून अ‍ॅडमीट आहे तर तुम्हाला कळले पाहिजे ना. तुम्ही डीन आहात की तुम्ही खोटी डिग्री घेऊन बसला आहात. अशा व्यक्तीवर जर कारवाई करत नसाल, तो व्यक्ती काय करतोय याची माहिती नसेल तर त्या रॅकेटमध्ये तुम्हीसुद्धा सहभागी असता असा थेट आरोप पवार यांनी ससूनच्या अधिष्ठाता ठाकूर यांच्यावर केला आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news