ऐन सणासुदीतही झेंडू रूसलेलाच ! बाजारभाव कमीच | पुढारी

ऐन सणासुदीतही झेंडू रूसलेलाच ! बाजारभाव कमीच

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली तरीदेखील झेंडूच्या फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. सध्या झेंडूच्या फुलांना किलोला दहा ते तीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. गुंतविलेल्या भांडवलाच्या तुलनेत हा बाजारभाव कमी असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. परतीच्या पावसाचाही फटका झेंडूच्या बागांना बसल्याने फुलांची वाढ खुंटली होती. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, काठापूर, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमध्ये झेंडूचे पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये झेंडूच्या फुलांना बाजारभावाची साथ मिळालीच नाही.

संबंधित बातम्या :

सणासुदीचे एक-दोन दिवस सोडले तर फुलांना किलोला दहा ते वीस रुपये एवढाच बाजारभाव मिळाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी झेंडूचे पीक हे मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनावर घेतले आहे. यासाठी लाखो रुपयांचे भांडवल गुंतविले आहे. बाजारभावाची साथ फुलांना मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. नवरात्र उत्सवाला सुरुवात होऊन दोन-तीन दिवस झाले. परंतु, फुलांच्या बाजारभावात म्हणावी तशी वाढ झालेलीच नाही. गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी झेंडूच्या पिकांमध्ये साचून राहिल्याने झाडे सडून खराब झाली. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सध्या झेंडूच्या फुलांना किलोला साठ ते सत्तर रुपयांपर्यंत बाजारभाव मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती.

प्लास्टिकच्या फुलांची चलती
सध्या बाजारपेठांमध्ये प्लास्टिकच्या फुलांची चलती आहे. नवरात्रोत्सवात गावोगावच्या मंदिरांवर फुलांची सजावट केली जाते. परंतु, सध्या या सजावटीसाठी प्लास्टिकच्या फुलांचाच वापर अधिक होताना दिसत आहे.

Back to top button