Pune Crime News : पुण्यात जुगार अड्डा लुटला गुन्हेगारांनी ! सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Pune Crime News : पुण्यात जुगार अड्डा लुटला गुन्हेगारांनी ! सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Published on

पुणे : पोलिस चौकीजवळच बेकायदा जुगार अड्डा सुरू… त्यात पिस्तूल, तलवारीसह तीन गुन्हेगार शिरले… धाक दाखवत रोकड लुटली.. अन् आरामात पसार झाले. याची तक्रार, फिर्याद ना तपास… 'तेरी भी चुप और मेरी भी चुप' असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, शहराच्या मध्यवस्तीत रात्री साडेआठच्या सुमाराला ही घटना घडली आहे.

बुधवार पेठेत दत्तमंदिराजवळ एका छोट्याशा गल्लीत हा जुगार अड्डा गर्दीने खचाखच भरलेला होता. सर्वजण जुगार खेळण्यात गुंग. त्याच वेळी तिघे तोंडाला रुमाल बांधून प्रवेश करतात. एकजण पिस्तूल काढतो, दुसरा तलवार… त्यावेळी अचानक स्मशानशांतता पसरते. काय घडतंय याचा अंदाज येताच जुगारी व अड्डा चालविणारे तेथून काढता पाय घेतात. रिकाम्या झालेल्या अड्ड्यावरील सर्व रोकड, गल्ल्यातील नोटा चोरटे गोळा करून पसार होतात. सुमारे एक लाख रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

ही घटना घडली 11 ऑक्टोबर रोजी शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ. मात्र अद्याप पोलिस ठाण्यात कोणी तक्रार देण्यास आलेले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला. याबाबत फरासखाना पोलिसांना विचारले असता, त्यांनी सांगितले, याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका जुगार अड्ड्यावर असाच प्रकार घडल्याचे समजते.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही याचाच रिप्ले घडल्याची माहिती आहे. महापालिकेच्या समोर असलेल्या जुगार अड्ड्यात शिरून चोरट्यांनी तलवरीच्या धाकाने रोकड लुटली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांना विचारले असता, त्यांनीदेखील अद्याप आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांत शहरात तीन ते चार लुटीचे प्रकार घडल्याची माहिती आहे. मात्र प्रश्न जुगार अड्ड्याचा असल्यामुळे स्थानिक पोलिसांनी 'हाताची घडी, तोंडावर बोट' ठेवले आहे.

शिवाय राजरोस हद्दीत जुगार चालू असल्याचे कोण त्याची वाच्यता करेल, हासुद्धा एक मोठा सवाल आहे. प्रश्न जुगार अड्ड्याचा नाही. थेट पिस्तूल आणि तलवारी घेऊन गुन्हेगार कोणतेही भय न बाळगता लुटमार करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान जुगारअड्डा लुटीचे व्हिडीओ बाहेर पडू नयेत म्हणून स्थानिक पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

नेमकं काय चाललंय पुण्यात?

वेळ रात्री 9 वाजताची…ठिकाण शिवाजीनगर महापालिकेसमोरील एक जुगार अड्डा.. दोघेजण तेथे स्टूलवर चकना खात मद्यप्राशन करत होते. त्याचवेळी चौघे शस्त्रधारी आत प्रवेश करतात. एकजण कमरेचे पिस्तूल काढून लोड करतो. तर
दुसरा तलवार दाखवतो..त्याचवेळी तिसरा एकावर कुर्‍हाड उगारतो. तर चौथा रोकड शोधतो. त्यानंतर चौघे चोरटे जुगार अड्ड्यावरील दोघांच्या खिशातील आणि गल्ल्यातील रोकड घेऊन पसार होतात. 10 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

गुन्हे शाखा अक्षरश: ढेपाळलीय…

गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी शहरात गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा तैनात आहे. वाहनचोरी आणि दरोडा, अमली पदार्थविरोधी दोन पथके, खंडणीविरोधी पथक त्याचसोबत सहा गुन्हे शाखेची युनिट आहेत. मात्र अद्याप त्यांची चमकदार कामगिरी दिसून येत नाही. वाहनचोरीचे प्रकार शहरात वाढीस लागले आहेत. दररोज सहा ते सात वाहने शहरातून चोरीला जातात. पादचा-यांना दुचाकीस्वार चोरट्यांकडून लुटले जात आहे. मोबाईल, दागिणे चोरटे लंपास करत आहेत. जुगार अड्डा लुटीचा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची वाट न पाहता गुन्हे शाखेच्या पथकांनी केवळ आरोपींना पकडून त्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. मात्र तसे त्यांच्याकडून होत नाही.मग, गुन्हे शाखेत दाखल होणारे पोलिस केवळ शहरभर रुबाब मिरविण्यात धन्यता मानतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक ठाण्याची पथके सुस्त

तपास पथकाचा प्रभारी अधिकारी होण्यापासून ते तपास पथकात काम करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचा-यांची धडपड असते. मात्र एकदा का तेथे वर्णी लागली की, त्यांना मूळ कामगिरीचा विसर पडतो. पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे, आरोपींना पकडणे ही प्रामुख्याने तपास पथकाची कामे आहेत. मात्र, काही पोलिस ठाण्यांची तपास पथके वगळता इतर मात्र सुस्तावली आहेत. अनेकदा त्यांना आपल्या हद्दीत काय घडले आहे याची माहितीदेखील नसल्याचे काही प्रकरणांतून दिसून आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news