भिडेवाडा जिंकला! पुण्यात रिपाइं-भाजप-राष्ट्रवादीकडून जल्लोष

भिडेवाडा जिंकला! पुण्यात रिपाइं-भाजप-राष्ट्रवादीकडून जल्लोष

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भिडेवाड्याच्या भूसंपादनाचा निर्णय उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने दिल्यानंतर रिपाइं (आठवले गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी भिडेवाड्यासमोर पेढे वाटून आनंद साजरा केला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फुले दाम्पत्याचा जयघोष केला.

रिपाइंचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, अ‍ॅड. मंदार जोशी, संजय सोनवणे, भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेवक योगेश समेळ, धनंजय जाधव, मनीषा लडकत, संदीप लडकत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, दत्ता सागरे, प्रिया गदादे, पूजा जोळे, हरीश लडकत, प्रशांत कडू, अच्युत लांडगे, शाहरुख शेख आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

उच्च न्यायालयामध्ये मुलींची भारतातील पहिली शाळा भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला. भिडेवाडा येथे स्मारक करण्यास राजकीय इच्छाशक्तीचे बळ मिळत नव्हते. सरकारने तर न्यायालयामध्ये या ठिकाणी पहिली शाळा होती, याचे पुरावे नाहीत, अशी मांडणी सुरुवातीला केली होती. गेली 25 वर्षे आम्ही दिलेल्या लढ्याला अखेर यश आले.

नितीन पवार, निमंत्रक, मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती

न्यायालयाच्या निकालाने भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नातून आज हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण पुणेकरांना मिळाला.

हेमंत रासने, माजी अध्यक्ष,
स्थायी समिती

राष्ट्रवादीने भिडेवाड्यासंदर्भात राज्य शासन, पुणे महापालिका यांना वेळोवेळी भेटून निवेदने देण्यात आली, स्वाक्षरी मोहीम घेतली आहे. या प्रयत्नांना यश आले आहे. आता या ठिकाणी तातडीने पावले उचलून या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक व्हावे.

दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)

भिडेवाड्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटला महापालिकेने, सरकारने जिंकला. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला. गेल्या कित्येक वर्षांपासून आंबेडकरी चळवळ आणि रिपाइं भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आग्रही होती. त्याला अखेर यश मिळाले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकात रूपांतरित व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना या विषयात जातीने लक्ष घातले. या ठिकाणी भव्य स्मारक व्हावे, हे स्वप्न पूर्णत्वास जाणार, ही बाब अतिशय आनंदाची आहे.

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी (शरद पवार)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news