Antibiotic Medicine : अँटिबायोटिक औषधांचा प्रभाव घटला!

Antibiotic Medicine : अँटिबायोटिक औषधांचा प्रभाव घटला!
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशभरातील रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांत दाखल झालेल्या व गंभीर संसर्ग असलेल्या अनेक रुग्णांवर कोणत्याही अँटिबायोटिक औषधांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. अँटिबायोटिक औषधे अशी कुचकामी ठरत असल्याने अनेक रुग्णांचे प्राण टांगणीला लागले आहेत. सर्वात परिणामकारक समजली जाणारी अँटिबायोटिक औषधेही केवळ 20 टक्केच प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'ने (एम्स) देशभरातील रुग्णालयांची एक पाहणी करून याबाबतचा धक्कादायक निष्कर्ष आपल्या अहवालात काढला आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे अँटिबायोटिक औषधांचा प्रभाव कमी होत चालल्याचे जगभरात दिसून आलेले आहे. अँटिबायोटिक औषधांचा सातत्याने होत असलेला माराही त्यामागील एक कारण आहे. आपल्या देशातही अँटिबायोटिक औषधांचा परिणाम रुग्णांवर फारसा होत नसल्याचे आता 'एम्स'च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सर्वात नवी औषधे जागतिक आरोग्य संघटनेने 'रिझर्व्ह कॅटॅगरी' (राखीव श्रेणी) मध्ये ठेवली आहेत. अशी औषधेही अनेक वेळा काम करीत नाहीत, असे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 'रिझर्व्ह कॅटॅगरी'च्या औषधांचा केवळ निवडक प्रसंगीच वापर केला जात असतो. देशातील अनेक रुग्णालयांच्या साथीने 'एम्स'ने एक नेटवर्क तयार केले आहे. सर्वात परिणामकारक अँटिबायोटिकही केवळ 20 टक्के रुग्णांबाबतच परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण संकटातच आहेत. याचे कारण म्हणजे, रुग्ण आणि डॉक्टरांकडून स्वतःच्या मर्जीने अँटिबायोटिक्सचा होत असलेला बेसुमार वापर. अशावेळी रुग्णालयांमध्ये इन्फेक्शनचा म्हणजेच संसर्गाचा स्तर नियंत्रित केला जाणे हाच एक मार्ग शिल्लक राहतो.

रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांत (आयसीयू) रुग्णांना लावले जाणारे कॅथेटर, कॅन्युला आणि अन्य उपकरणांमध्ये अनेक जीवाणू निर्माण होत असतात. आधीच आजारी असलेल्या व कमजोर रोगप्रतिकारक क्षमतेच्या रुग्णांना ते आणखी आजारी बनवतात. दीर्घकाळापर्यंत आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांमध्ये अशा इन्फेक्शनचा धोका वाढतो. आता हे इन्फेक्शन रक्तात पोहोचत आहे व त्यामुळे संपूर्ण शरीरात सेप्सिस होण्याचा धोका वाढतो. या स्थितीत रुग्णाचे अनेक अवयव निकामी होत जातात.

'एम्स' ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. कामरान फारुकी यांनी म्हटले आहे की, न्युमोनियाचे रुण दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर असतात. त्यामुळे त्यांना कॅन्युला, कॅथेटर किंवा यूरिन बॅग लावलेल्या असतात. यामुळे त्यांच्यामध्ये घातक जंतुसंसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.

दक्षिणेतील रुग्णालयांमध्ये अधिक चांगली स्थिती

दिल्लीच्या एम्स ट्रॉमा सेंटरच्या इन्फेक्शन कंट्रोल पॉलिसीला संपूर्ण देशात लागू करण्यासाठी डॉ. पूर्वा माथूर यांच्या निगराणीखाली सर्व रुग्णालयांना जोडले जात आहे. डॉ. माथूर यांच्या माहितीनुसार, उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात इन्फेक्शनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. ढोबळमानाने खासगी रुग्णालयांमधील इन्फेक्शन कंट्रोल किंवा संसर्ग नियंत्रण हे सरकारी रुग्णालयांपेक्षा अधिक सरस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news