

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'आरक्षणाची मागणी करीत असलेल्या सर्व समाजांना आरक्षण दिले पाहिजे. मात्र, राज्यघटनेने अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण दिले आहे. त्याला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार झाला पाहिजे. वेगळ्या कोट्यातून इतर समाजांची आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात यावी,' असे मत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात विविध समाजांच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण दिल्यास त्या नाराजीतून केंद्र सरकार कोसळू शकते, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला होता. त्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी साखर संकुल येथे सोमवारी (दि.16) आले असता पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
मुंबईतील बैठकीत शरद पवार यांनी जनतेच्या मनात राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली आहे, हे माहीत असल्याच्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले, की पवार साहेब यांनी त्यांची बाजू त्यांच्या पद्धतीने मांडलेली आहे आणि या संदर्भातील ज्या काही घडामोडी झाल्या, कोर्ट अथवा अन्य प्रक्रियेत मी नव्हतो. त्यामुळे मी अधिकारवाणीने त्यावर काँमेंट करू शकणार नाही. राष्ट्रवादी कोणाची हे निवडणूक आयोग आणि न्यायालय ठरवेल. पवार यांच्या म्हणण्यावर मी प्रतिक्रिया देत नसतो आणि देणारही नाही.
मीरा बोरवणकर यांचे पुस्तक मी वाचले नाही आणि पाहिलेही नाही. त्यामुळे त्यांनी त्यात काय आणि कशाबाबत लिहिले आहे, हे समजून घेतल्याशिवाय ते स्पष्ट होणार नाही. अजित पवार असे काही करतील, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. ससून प्रकरणात अद्याप आरोपी सापडत नसल्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, की संबंधित पोलिस अधिकार्यांशी मी फोनवरून चर्चा केली आहे. जो आरोपी सापडत नाही, तो आम्ही शोधून काढू, असे त्यांनी मला सांगितले. मात्र, यामध्ये ससूनचे डॉक्टर, प्रशासन आणि कारागृह प्रशासनाकडून जिथे चुका घडल्या आहेत, त्याची चौकशी करून दोषींना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
पुण्याच्या कारभारात खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातल्याबद्दल विचारले असता वळसे म्हणाले, की खा. सुळे यांनी पुण्यात लक्ष घातले, तर त्यात काहीही चुकीचे नाही. सुप्रिया सुळे यांना यापूर्वीही प्रतिबंध नव्हता, आताही त्यांचे स्वागत आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. परंतु, संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो, असेही ते म्हणाले.
हेही वाचा