Gold Price Hike : युद्धामुळे सोने, चांदी तेजीकडे; घ्या जाणून आजचा भाव | पुढारी

Gold Price Hike : युद्धामुळे सोने, चांदी तेजीकडे; घ्या जाणून आजचा भाव

पुणे : इस्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्याने त्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय सोने बाजारावर पडला आहे. त्यामुळे सोने व चांदीमध्ये मागील काही दिवसांत सातत्याने होणार्‍या घसरणीला ब्रेक बसला आहे. गौरी विसर्जन व त्यानंतर पितृपक्षकाळ सुरू झाल्यापासून सोन्याच्या मागणीत घट झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत होती. अखेर, सोमवारी सोन्यामध्ये प्रतितोळ्यामागे चारशे रुपयांनी वाढ होऊन दर 57 हजार 200 रुपयांवर, तर चांदी किलोमागे एक हजार रुपयांची उसळी घेत 68 हजार 900 रुपयांवर पोहोचली.

गौरी विसर्जनाच्या दोन दिवसांनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. पितृपक्ष सुरू होताच काही प्रमाणात सोन्याला मागणी घटल्याने सोन्याचे दर 57 हजारांच्या आत आले. सोन्याचे दर कमी आहेत, ही संधी साधत अनेकांनी सोने खरेदी सुरू केली होती. या काळात सोन्याचे भाव सातत्याने घसरत होते. अखेर, इस्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम सराफा बाजारावर होऊन सोन्याच्या दरात सातत्याने होणार्‍या घसरणीला त्याचा ब्रेक बसल्याने सोमवारी शहरात सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 57 हजार 200 रुपयांवर, तर चांदीचा किलोचा दर 57 हजार 200 रुपयांवर स्थिरावल्याचे पुष्पम ज्वेलर्सचे जीत मेहता यांनी सांगितले.

सोने व चांदीत युद्धामुळे झालेली दरवाढ ही फार काळ राहणार नाही. मात्र, येत्या काळात सेंट्रल बँक खरेदी, उत्सवांचा काळ तसेच यूएस फेडरर रिझर्व्हचे इंटरेस्ट संदर्भातील धोरण या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची दरवाढ होईल. जगभरात सध्या चलनवाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यामुळे सोन्याचे भाव वाढू शकतात.

– अमित मोडक,
सीईओ, पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स.

हेही वाचा

Nashik Crime : छाेटी भाभीच्या संपर्कातील साखळी उजेडात

Nashik News : एमडी ड्रग्जप्रकरणी दादा भुसे यांचे पटोलेंना आव्हान

Sugar Factories : पात्रता नसलेल्या 38 अधिकार्‍यांकडे ‘एमडी’चा पदभार

Back to top button