Israel-Hamas war update : गाझाची कोंडी करीत इस्रायलचे तांडव

Israel-Hamas war update : गाझाची कोंडी करीत इस्रायलचे तांडव
Published on
Updated on

जेरुसलेम; वृत्तसंस्था : हमाससोबत गाझाच नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने तुफानी हल्ले सुरूच ठेवले असून गाझातील मृतांचा आकडा 500 च्या पुढे गेला आहे; तर अनेक मशिदी, इमारती भुईसपाट करण्यात आल्या. गाझाचा अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि वीज पुरवठा इस्रायलने बंद केला असून आगामी काळात हमासचा नायनाट करण्याचा विडा उचलला आहे. दुसरीकडे याही स्थितीत हमासने हल्ले सुरूच ठेवले असून गाझानजीकच्या इस्रायली गावांवर पुन्हा क्षेपणास्त्रे डागण्यात आली; तर जेरुसलेमच्या विमानतळाच्या परिसरातही हमासची दोन क्षेपणास्त्रे धडकली. (Israel-Hamas war update )

शनिवारी सुरू झालेले इस्रायल- हमास युद्ध तिसर्‍या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी इस्रायली विमाने व क्षेपणास्त्रांनी गाझा पट्टीच्या विविध भागांवर जोरदार हल्ले चढवत अनेक मशिदी व इमारती बॉम्बवर्षाव करून पाडल्या. त्यात अनेकजण मरण पावले. एकीकडे हे हल्ले सुरू असतानाच इस्रायलने गाझाची सारी रसदच तोडली आहे. त्यात गाझा पट्टीतील अन्नधान्य पुरवठा, जीवनावश्यक वस्तू, इंधन व वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. गाझाची पुरती कोंडी करून हल्ला करण्याची ही रणनीती असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पॅलेस्टिनींचा आकडा 500 हून अधिक झाला असून 2100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. दरम्यान, सोमवारीही गाझा पट्टीनजीकच्या गावांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. इस्रायलने ही गावे ताब्यात घेतल्याचा दावा केला असला तरी त्या गावांवर सोमवारी पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे सोडली. त्यात अनेकजण जखमी झाले.
तिकडे वेस्ट बँकेतून हमासच्या दहशतवाद्यांनी जेरुसलेमवरही दोन क्षेपणास्त्रे डागल्याने इस्रायलच्या चिंता वाढल्या आहेत. सोमवारी जेेरुसलेमच्या विमानतळाच्या भागातच ही क्षेपणास्त्रे धडकल्याने तेथे आपत्कालीन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात आला. (Israel-Hamas war update )

दरम्यान, इस्रायली संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, आतापर्यंत इस्रायलने गाझावर 500 हल्ले केले असून हमासचा नायनाट होईपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील. हमासने प्रथमच नौदल तुकडीचा वापर करून हल्ला चढवल्याने इस्रायलही चकित झाले होते. हमासच्या या मरिन कमांडो दलाच्या घाली या प्रमुखाला इस्रायली पथकाच्या एका मिशनमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याकडून बरीच माहिती मिळेल, अशी मोसादला आशा आहे.

संगीत महोत्सवात 260 ठार

शनिवारच्या हमासच्या हल्ल्यात झालेल्या हानीची खरी तीव्रता आता समोर येत आहे. इस्रायली भागांत झालेल्या या हल्ल्यांत मरण पावलेल्यांचा आकडा एक हजारांच्या वर गेला आहे. त्यात सर्वाधिक 260 बळी एकाच गावात गेले. सुक्कोतच्या उत्सवानिमित्त किबुत्झ रिम येथे नेगेव्ह वाळवंटात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी तीन हजार लोक या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना पॅराग्लायडिंग करत आलेल्या हमासच्या टोळ्यांनी या स्थळाला तिन्ही बाजूंनी घेरत अंदाधुंद गोळीबार केला. रॉकेटस् डागले. या ठिकाणी तीन तास चाललेल्या रक्ताच्या होळीत 260 इस्रायली मारले गेले. इस्रायली सैनिकांचे पथक तेथे पोहोचले तेव्हा फक्त मृतदेहांचा खच पडला होता. एकाच ठिकाणी इतके माणसे मारली जाण्याची इस्रायलमधील ही पहिलीच वेळ आहे.

अमेरिकेला मागितली मदत

दरम्यान, इस्रायलने अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितली आहे. क्षेपणास्त्र यंत्रणा मजबूत करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा साठा पुरवावा अशी विनंती इस्रायलने अमेरिकेकडे केली आहे. याशिवाय विमानांतून बॉम्बफेक करण्यासाठी घातक बॉम्बचीही मागणी त्यांनी केली आहे. (Israel-Hamas war update )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news