नाशिक : पुढारी वृत्तसेवा, वडाळा गावात अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करीत वसीम रफीक शेख (३६) व नसरीन उर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (३२, दोघे रा. सादिकनगर, वडाळा गाव) या दोघांना एमडी ड्रग्ज व गांजासह पकडले होते. दोघांच्या चौकशीतून इतर दोघांची नावे समोर आली असून, हे दोघेही शहरात ड्रग्ज पुरवठा करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांचाही शोध सुरू केला आहे. दरम्यान, न्यायालयाने वसीम व नसरीन शेख या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Nashik Crime)
अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी (दि. ५) वडाळा गाव परिसरातील झोपडीतून ५४.४ ग्रॅम एमडीसह एक किलो गांजा असा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी छोटी भाभीसह वसीमला अटक केली. दोन्ही संशयितांना न्यायालयाने सोमवार (दि. ९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांच्या तपासात संशयितांनी त्यांच्या दोन साथीदारांची नावे सांगितली आहेत. त्यानुसार संबंधितांच्या मागावर पथके रवाना झाली आहेत. सोमवारी (दि. ९) दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही संशयितांची पोलिस कोठडी राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. संशयित छोटी भाभीने पोलिस कोठडीत असताना आजारपणाची तक्रार केल्याने तिच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले हाेते. (Nashik Crime)
हेही वाचा :