Sassoon hospital news : मागितले एक, दिले भलतेच; फक्त दीड पानी अहवाल

Sassoon hospital news  : मागितले एक, दिले भलतेच; फक्त दीड पानी अहवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातील अडचणी आणि कैद्यांवर सुरू असलेल्या उपचाराची सविस्तर माहिती असलेला अहवाल 24 तासांच्या आत सादर करा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी ससून प्रशासनाला शुक्रवारी केल्या होत्या. त्यावर अधिष्ठातांनी तब्बल दोन पानांचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये कैद्यांच्या उपचाराचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे ससूनचा अहवाल म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पसार झाला. तेव्हापासून चर्चेत आलेल्या ससून रुग्णातील अनेक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्तांना ससून रुग्णालय आणि कैद्यांच्या 16 क्रमाकांच्या वाॅर्डाची पाहाणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी ससून रुग्णालयांची संयुक्त पाहाणी केली. त्या वेळी ससून रुग्णालयातील सोयी-सुविधा, उपलब्ध कर्मचारी आणि कैद्यांवर सुरू असलेले उपचार आणि त्यांची सविस्तर माहिती असलेला अहवाल 24 तासांत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांची स्वाक्षरी असलेला दोन पानांचा अहवाल विभागीय आयुक्त सौरभ राव यांना सादर केला आहे.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैदी रुग्णाचे पलायन, उपचार घेत असलेले कैदी, त्यांचे आजार, ते किती दिवसांपासून उपचार घेत असून, त्यांच्यावर काय उपचार केले जात आहेत, याची सविस्तर माहिती असलेला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या अहवालात कैद्यांचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाने अहवाल पाठविण्याचा फार्स केल्याची दिसून येत आहे.

काय आहे अहवालात ?

ससूनमध्ये सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून 12 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यापैकी आठ कोटी 57 लाख 50 हजार रुपये प्राप्त झाले. या निधीपैकी सहा कोटी 27 हजार रुपये ससूनकडून हाफकिन संस्थेला वर्ग करण्यात आले, तर उर्वरित दोन कोटी 57 लाख 23 हजार रुपयांची संस्थास्तरावर औषधे खरेदी करण्यात आली. मात्र, सन 2022-23 या आर्थिक वर्षात हाफकिन संस्थेला ससूनकडून औषधे खरेदीसाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी कोणतेही औषधे प्राप्त झालेली नाहीत. चालू आर्थिक वर्षासाठी 12 कोटी 25 लाख रुपये ससूनला मंजूर झाले. त्यापैकी तीन कोटी 67 लाख 50 हजार रुपये प्राप्त झाले.

त्यापैकी 49 लाख 55 हजार रुपयांची औषधे खरेदी ससूनस्तरावर करण्यात आली. ससूनमध्ये परिचारिकांची 1101 पदे मंजूर असून, त्यापैकी 997 पदे भरली आहेत, तर 104 पदे रिक्त आहेत. वर्ग चारची 834 पदे मंजूर असून, त्यापैकी 453 पदे भरली आहेत, तर 381 पदे रिक्त आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग चारची 171 पदे मंजूर असून, त्यापैकी 74 पदे भरली आहेत, तर 97 पदे रिक्त आहेत. ससूनमध्ये साफसफाईसाठी खासगी संस्थेकडून 180 वर्ग चारची पदे भरली आहेत. ससूनमध्ये 1296 खाटा मंजूर आहेत. मात्र, उपचारांची निकड पाहता 1800 खाटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंजूर पदे 1296 खाटांसाठी असून, वाढीव खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.

ससूनमधील कैद्यांच्या सर्व माहितीबाबत अहवाल तयार करण्यात आला असून, त्याबाबत विशेष गठित करण्यात आलेल्या समितीची बैठकही पार पडली आहे. गोपनीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औषध साठा, रुग्णसेवा याबाबतचा अहवालही विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आला आहे.

– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news