मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याने घरोघरी माईक घेऊन फिरण्याची वेळ : जयंत पाटील
इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इस्लामपूरमध्ये माईक घेऊन घरोघरी फिरले. पंतप्रधान मोदी साहेबांची लोकप्रियता कमी होत असल्यानेच भाजपकडून असे उपक्रम राबविले जात असल्याची टीका, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केली.
आ. जयंत पाटील यांना ४४० व्होल्टचा झटका बसल्याने ते दिल्लीला गेले आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी इस्लामपूरात संवाद यात्रे दरम्यान केली होती. त्यानंतर साखराळे येथील कार्यक्रमात बोलताना आ. पाटील यांनी बावनकुळे यांना लक्ष्य केले.
आ. जयंत पाटील म्हणाले, सरकारे येतात आणि जातात,मात्र सध्या आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे,ती देशासाठी घातक आहे. देशात महागाईने कळस गाठला असून सामान्य माणूस या महागाईने होरपळला जात आहे. सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.
ते म्हणाले,आमचे मित्र चंद्रशेखर बावनकुळे काल इस्लामपूर मध्ये माईक घेऊन घरोघरी फिरले. मोदी साहेबांची लोकप्रियता कमी होत असल्याने असे उपक्रम भाजपला राबवावे लागत आहेत.
आ.पाटील म्हणाले,नांदेडच्या हॉस्पिटल मध्ये औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे,हे दुर्दैवी आहे. आमच्या काळात आम्ही औषध खरेदीचे अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या सरकार ने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता आम्ही बोलू लागल्यावर अधिकाऱ्यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढला आहे. सध्या अंगणवाडी शिक्षिकेंचे पगार करायला पैसे नाही. अपंग,वृध्द,विधवा महिला,निराधार व्यक्तींना वेळेवर पेन्शनचे पैसे मिळत नाहीत. मात्र आपल्या साहेबांनी जी २० वर ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. काम कमी मात्र,जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सध्या निवडणूका जवळ येतील,तशा विविध सवलती जाहीर केल्या जात आहेत. मात्र जनता आता फसणार नाही.

