पुणे : पालिकेच्या शाळेत ‘गर्दीचा वर्ग’ ; दोन ते तीन वर्गांमधील विद्यार्थी एकाच वर्गात | पुढारी

पुणे : पालिकेच्या शाळेत ‘गर्दीचा वर्ग’ ; दोन ते तीन वर्गांमधील विद्यार्थी एकाच वर्गात

शंकर कवडे

पुणे : शाळा सुरू झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून वेतन थकविल्याने कंत्राटी शिक्षकांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. शाळांमध्ये शिक्षकांची आधीच अपुरी संख्या, त्यात कंत्राटी शिक्षकांनी राजीनाम्याचे हत्यार उपसल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकत्रित तसेच क्षमतेपेक्षा जास्त संख्येने एकाच वर्गात जमिनीवर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पुणे शहरात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या जवळपास 54 प्राथमिक शाळा आहेत.

संबंधित बातम्या : 

येथील प्रत्येक शाळेमध्ये 300 ते 500 हून अधिक विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतात. शाळेतील दहा ते पंधरा शिक्षकांमागे सरासरी पाच ते सहा शिक्षक कंत्राटी तत्त्वावर अध्यापनाचे काम करतात. कंत्राटी स्वरूपात काम करणार्‍या या शिक्षकांची मागील वर्षांची अनामत रक्कम व चालू वर्षातील चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने शिक्षकांनी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक विभागाकडे वेतनाची तक्रार केली. मात्र, त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षकांनी मुख्याध्यापकांसह अतिरिक्त आयुक्तांकडे बुधवारी (दि. 4) सामूहिक राजीनामा सादर केला आहे. परिणामी, मागील दोन दिवसांत शाळेतील शिक्षकांची संख्या निम्म्यावर आली आहे.

शिक्षकांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे शाळेतील उपलब्ध शिक्षकांवर या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी आली आहे. काही शाळांमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी शिक्षक असल्याने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सामूहिकरीत्या शिक्षण दिले जाऊ लागले आहे. तर, बहुतांश ठिकाणी दोन ते तीन वर्गांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवित शिकविण्याचे काम सुरू आहे. एरवीच्या तुलनेत एकाच वर्गामध्ये वर्गाच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून तसेच काही ठिकाणी एकाच बेंचवर तिघांना बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

  • जमिनीवर तसेच एकाच बेंचवर दाटीवाटीने बसून शिक्षणाचे धडे
  • वेतनाअभावी कंत्राटी शिक्षकांनी दिलेल्या राजीनाम्याचा परिणाम

Back to top button