ओतूर : पुढारी वृत्तसेवा : कल्याण ते शिरोली-जुन्नरकडे येणाऱ्या एसटी बस व कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन बसमधील १५ ते २० प्रवासी गंभिर जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. हा अपघात माळशेज घाटातील खुबी गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि.६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला असून धडकेनंतर ट्रक उलटून ट्रक चालक उलटलेल्या ट्रकमध्ये बराच वेळ अडकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी त्वरेने धाव घेत जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर घटनास्थळाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रात्रीच्या काळोखामुळे मदत कार्यात अडथळे येत होते.