Ajit Pawar In Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर | पुढारी

Ajit Pawar In Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ७) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कळवण येथे शेतकरी मेळावा होणार असून, नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवनात ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधणार असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (Ajit Pawar In Nashik)

 संबधित बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर नाशिक जिल्हा काबीज करण्यासाठी शरद पवार व अजित पवार गटात संघर्ष सुरू झाला आहे. माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे पक्ष प्रभारी प्राजक्त तनपुरे यांनी नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांचीच जादू चालणार असे नमूद करत आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार समर्थक आमदारांचीच सरशी होईल, दावा केल्यानंतर छगन भुजबळ समर्थकांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये शरद पवार व अजित पवार समर्थकांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल दौरा…

शनिवारी (दि.७) सकाळी ९.४० वाजता त्यांचे नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होईल. याठिकाणी विधानसभेतील उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर कळवणच्या दिशेने ते प्रस्थान करतील. या मार्गात दिंडोरी शहर, अवनखेड, वणी, लखमापूर फाटा, वणी चौफुली तसेच कळवण तालुक्यातील नांदुरी येथे त्यांचे स्वागत केले जाईल. कळवण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाईल. कळवण येथील नाकोडा रोडवरील साई लॉन्स येथे आमदार नितीन पवार यांनी आयोजित केलेल्या शेतकरी व कृतज्ञता सोहळ्यात ते मार्गदर्शन करतील. यावेळी विविध विकासकामांची उद‌्घाटने देखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाणार आहेत. दुपारी ३ वाजता ते दिंडोरीतील सह्याद्री अॅग्रो फार्मला भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नाशिक शहरातील मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनात ते पक्षाच्या पदाधिकारी आणि निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ७.३०वाजता ते माजी आमदार जयंत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता ओझर विमानतळावरून ते मुंबईच्या दिशेने प्रयाण करतील.

Back to top button