Pune News : प्लॅनिंग करून ड्रग तस्कर ललीतने ‘ससून’मधून ठोकली धूम? | पुढारी

Pune News : प्लॅनिंग करून ड्रग तस्कर ललीतने ‘ससून’मधून ठोकली धूम?

पुणेः ड्रग्ज तस्करीच्या दुसर्‍या मोठ्या गुन्ह्यात आपण अडकल्याचे ललीत पाटील याला कळले होते. पूर्वीच्या गुन्ह्यात अद्याप जामीन नव्हता. त्यात दुसरा गुन्हा. यातून आता लवकर सुटका नाही याची चाहूल त्याला लागली. त्यातूनच पाटीलने कारवाई झाल्यापासून 36 तासांच्या आत ससून रुग्णालयातून पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली. यासाठी त्याने अगोदर प्लॅनिंग केल्याची माहिती आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत वार्ड क्रमांक सोळामध्ये असलेल्या एका आरोपीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. सूत्रांनी ऑफ द रेकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार, ललीत पाटील येरवडा कारागृहात चाकण येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी होता.

2020 मध्ये 132 किलो अमली पदार्थाचे उत्पादन करून विक्री केल्याप्रकणी हा गुन्हा दाखल आहे. वैद्यकीय उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आर्थिक रेटींगचे सेटींग करून तो येथे दाखल झाल्याचे समजते. मागील चार महिन्यांपासून त्याचा मुक्काम वार्ड क्रमांक सोळा येथे होता. लक्ष्मीदर्शनातून विविध सोयी-सुविधांचा लाभ घेत पाटलाने थेट ससून रुग्णालयातून ड्रग्ज् तस्करीचे रॅकेट चालविण्यास सुरूवात केली. आपल्या कृत्याचा कुणालाही सुगावा लागू नये म्हणून तो वेळोवेळी अनेकांचे हात ओले करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे वार्डमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे तोंड छताकडे करून ठेवण्यात आले होते का ? याचा तपास होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या कृत्याचा भांडाभोड करून तो चालवत असलेल्या ड्रग्ज् तस्करी रॅ’केटचा पर्दाफाश केला. आपण केलेल्या कृत्याची व्याप्ती पाटीलला समजली. अमली पदार्थ संबंधी चाकण येथे दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यात त्याला अद्याप जामीन मिळाला नव्हता. त्यात दुसरा मोठा गुन्हा , ड्रग्ज् तस्करीच्या व्यवसायिक विक्री (कमर्शिअल क्वांटीटी) गुन्ह्यात चार ते पाच वर्ष जामीन मिळत नाही. एकदा अटक झाली की मुक्काम कारागृहात. याच कालावधीत केस देखील न्यायालयात सुरू होते. जर पुरावे, साक्षी काटेकोर झाल्या तर गुन्ह्यात दहा ते वीस वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे पाटील अस्वस्थ झाला होता. त्याला कळून चुकले होते आता आपली सुटका नाही. त्यामुळे त्याने थेट ससून रुग्णालयातून पळू जाण्याची योजना तयार केल्याचे दिसून येत आहे.

नियोजनाप्रमाणे छातीचा एक्सरे करण्याची वेळ घेतली. एक्सरे आताच करावा लागेल असे सांगण्यात आले. हे सर्व करण्यासाठी विशेष भूमिका बजावली ती त्याच्यासोबत त्याच वार्ड क्रमांक सोळामध्ये तळ ठोकून असलेल्या एका आरोपीने. असे सुत्र सांगतात. ठरल्याप्रमाणे रात्री साडेसात वाजता पाटील याला एक्सरेसाठी बाहेर काढले. लिफ्टने न घेऊन जाता पोलिस कर्मचारी त्याला जिन्याने घेऊन गेला. त्यानंतर पाटील याने पळ काढला. पाटील याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली का याचा तपास पोलिस करत आहेत. त्याचबरोबर वार्डमध्ये पाटील याच्या जवळ असलेल्या त्या व्यक्तीची देखील चौकशी करण्यात येते आहेत. त्याच्याकडून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का ? हे पोलिस पाहता आहेत. कारण त्या व्यक्तीने पाटील याला बाहेर पडल्यानंतर पसार होण्यासाठी मदत केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पाटीलने यापूर्वीही दिली होती ‘ती’ ऑफर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील लेमन ट्री हॉटेलमध्ये त्याच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी जात होता. यापूर्वी तो तेथे गेल्याची माहिती आहे. फरार झाल्यानंतर देखील तो लेमन ट्री हॉटेलमध्येच गेला. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी कर्तव्यावरील एका पोलिसाला लेमन ट्री हॉटेलला घेऊन जाण्याची ऑफर दिली होती. मात्र,त्याने याला त्यावेळी नकार दिला होता.

Back to top button