Sasoon Hospital : ससून रुग्णालयाकडून अद्याप मौनच ! | पुढारी

Sasoon Hospital : ससून रुग्णालयाकडून अद्याप मौनच !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्यावर मंगळवारी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. बुधवारी वरिष्ठ कार्यालयाकडून कैद्यांच्या प्रकरणाबाबत डीन वगळता कोणीही टिप्पणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. डॉ. ठाकूर बुधवारीही उपलब्ध नसल्याने सोमवारी नेमके काय घडले? याबाबत अद्याप मौनच बाळगण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर यांनी बुधवारी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कैद्यांच्या प्रकरणाबाबत कोणीही ऑन रेकॉर्ड बोलू नये, केवळ अधिष्ठाता यांनीच अधिकृत माहिती द्यावी, असा सूचना या वेळी देण्यात आल्या. अधिष्ठाता डॉ. ठाकूर अधिष्ठातापदाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी मुंबईला गेले असल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.

संबंधित बातम्या :

तीन जणांची समिती

ससून रुग्णालयातर्फे 26 सप्टेंबरला तीन जणांची कैदी विभाग समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच आरोपी पळून गेल्याची घटना घडल्याने समितीतील डॉक्टरांवर तणाव असल्याचे जाणवले. पुढील काही दिवसांमध्येच कैद्यांच्या वॉर्डबाबत सर्व प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी समितीकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

संचालनालयास अहवाल सादर

रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याचा प्रकार घडल्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. वॉर्डमध्ये किती कैदी आहेत, त्यांना कोणते आजार आहेत, कोणत्या उपचारांची गरज आहे आणि कधीपर्यंत रुग्णालयात ठेवावे लागणार आहे, याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयास अहवाल सादर करण्यात आला आहे.

Back to top button