पुणे : गुन्हेगार तुरुंगामुळे सुधारत नाही : काळे | पुढारी

पुणे : गुन्हेगार तुरुंगामुळे सुधारत नाही : काळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणताही गुन्हेगार तुरुंगात गेल्यावर सुधारत नाही. त्यामुळे गुन्ह्याचा उगम जिथे होतो, तेथेच त्याला मदत करणे, त्याचे योग्य प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालावरील मुलांना समाजाने मदतीचा हात द्यावा, असे प्रतिपादन मुळेगाव (सोलापूर) येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन संचालित आदिवासी वंचित विद्यार्थी आश्रमशाळेचे संचालक परमेश्वर काळे यांनी केले.

समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा, ध्वज व ढाल-तलवार पथकाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त परमेश्वर काळे यांना ‘समर्थ गौरव’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी ते बोलत होते. पर्वतीदर्शन येथील व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार माधुरी मिसाळ, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, रेल्वे विभागाचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांच्यासह विविध मान्यवर व वादक उपस्थित होते.

काळे म्हणाले, ‘पारधी समाजाचा मुलगा म्हणून लहानपणी मी जे भोगले, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून मी शिक्षकाची नोकरी सोडून पालावरच्या मुलांसाठी काम सुरू केले.’ आ. मिसाळ म्हणाल्या, ‘ढोलपथकांच्या सहभागामुळे गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे.’ या वेळी कांबळे यांनी पथकांचे आयोध्येतील राम मंदिरापुढे वादन होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तर धिवरे यांनी वंचित समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सातपुते यांनी, तर सूत्रसंचालन अथर्व कुलकर्णी यांनी केले.

हेही वाचा

पिंपरी : न्यायालयीन इमारतीत सुविधांचा अभाव

हिंजवडी : आयटी परिसरात अपुर्‍या मोबाईल नेटवर्कमुळे नागरिक हैराण

Pimpri Crime News : प्रियकराचा खून करणार्‍यावर गुन्हा

Back to top button