हिंजवडी : आयटी परिसरात अपुर्‍या मोबाईल नेटवर्कमुळे नागरिक हैराण | पुढारी

हिंजवडी : आयटी परिसरात अपुर्‍या मोबाईल नेटवर्कमुळे नागरिक हैराण

हिंजवडी : आयटी परिसरातील कासारसाईमध्ये मागील काही महिन्यांपासून इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांची सेवा विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

5 जीचा स्पीडही झाला स्लो

परिसरातील हजारो नागरिक इंटरनेट वापरतात. परंतु, मागील काही महिन्यांपासून इंटरनेट सेवा पुरविणार्‍या कंपन्यांनी ग्राहकांना वार्‍यावर सोडले आहे. 4 जी, 5 जी सेवा पुरवणार्‍या या कंपन्यांचे नेटवर्क अतिशय कुचकामी ठरत असून याचा मनस्ताप आता व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य ग्राहकांना होत आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या ग्राहकसेवा प्रतिनिधींशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, की या परिसरात नेटवर्कची समस्या आहे. मात्र, ही समस्या पुढील किती दिवस राहील याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. कासारसाई परिसरात या कंपन्यांचे टॉवर्स असूनही इंटरनेटसेवा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.

स्पर्धेच्या युगातही सेवा खराब

अनेक इंटरनेट सेवा पुरविणार्‍या कंपन्यांनी मार्केटवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. प्रारंभी धडाकेबाज सुरुवात करून परिसरातील नागरिकांना आकर्षित केले. तसेच, नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सिम खरेदी केले. काहींनी पोर्टल करून घेतले. पाहता पाहता वर्ष लोटले; परंतु त्यानंतर इंटरनेट सेवा वारंवार खंडित होताना दिसत आहे. कधी 2 जी, तर कधी 4 जी सेवा मिळते, तर कधी पूर्णपणे इंटरनेट बंद पडलेले असेते. याचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे स्पर्धेच्या या युगात सेवा अधिक सुखकर होण्याऐवजी त्या अधिक खराब होत असल्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.

ग्राहकांनी व्यक्त केली नाराजी

काही दिवसांपासून या सेवेत खंड का पडत आहे, याचे कारण नागरिकांना कळलेच नाही. सीमकार्डधारकांनी महिन्याचे शेकडो रुपयांचे रिचार्ज करायचे तरीही सेवा बरोबर मिळत नसल्यामुळे कंपनीचे टॉवर काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 5 जी सेवा नाही पण 4 जी सेवा नियमित देण्यास कंपनी बांधिल आहे आणि ती द्यायलाच पाहिजे. अतिदुर्गम परिसरात सर्व मोबाइल कंपन्यांचे टॉवर तीन-चार वर्षांपूर्वी उभे करण्यात आले आहेत. येथील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना चांगली इंटरनेटसेवा मिळत नाही.

हेही वाचा

आकुर्डी गुरुद्वारा चौकात मोठंमोठे खड्डे; रोज होताहेत अपघात

Anil Patil : नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अनिल पाटील

देहूगाव : संततधार पावसाने सोयाबीन पीक धोक्यात

Back to top button