देहूगाव : संततधार पावसाने सोयाबीन पीक धोक्यात | पुढारी

देहूगाव : संततधार पावसाने सोयाबीन पीक धोक्यात

देहूगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपूर्वी संततधार पाऊस पडल्याने मावळ पट्ट्यातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ऊस कोलमडला
देहूगाव, विठ्ठलनगर, माळीनगर, सांगुर्डी, बोडकेवडी, येलवाडी, किन्हईगाव आणि कान्हेवाडी हा भाग मावळ पट्ट्यात मोडतो. गेली दोन दिवस संतधार पाऊस पडल्याने काही शेतकर्यांच्या शेतातील तरारलेली सोयाबीनची उभी पिके आता पिवळी पडली आहेत. तर, पाऊस आणि वार्यामुळे काही शेतकर्यांचा ऊस पूर्णपणे कोलमडला आहे. परिणामी सोयाबीन व उसाचे नुकसान झाल्याने शेतकर्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने या पावसामुळे झालेल्या शेतीतील पिकांचे पंचनामे त्वरित करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवणार
नुकसानग्रस्त शेतकर्यांनी लेखी अर्ज करावेत. त्यानुसार शासनातर्फे शिवारफेरी करून आवश्यक तिथे पंचनामे केले जातील. पिकाचे नुकसान कशामुळे झाले त्याचा अहवाल तयार करून शासनाकडे आर्थिक मदतीसाठी पाठविला जाईल. पावसापूर्वी किंवा पाऊस पडल्यानंतर ज्यांनी सोयाबीन पिकाला कीटक नाशकाची फवारणी केली अशा पिकांना कसलाही धोका नाही. परंतु, ज्यांनी किटक नाशकाची फवारणी केली नाही ,अशा सोयाबीन पिकावर करपा रोग पडला आहे. ऊस आणि भाताच्या पिकाला हा पाऊस पोषक आहे. या भागात पाणथळ जमिनी असल्याने, शेतातील साचलेले पाणी चरी करून काढले पाहिजे, देहूगाव विभागाच्या कृषी सहायक जयश्री पाडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा

बटाट्यावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव

तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जंगी स्वागत

पिंपरी : कोट्यवधींच्या व्यायाम साहित्याची लागतेय वाट

Back to top button