बटाट्यावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव | पुढारी

बटाट्यावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  बटाटा पिकावर लाल कोळी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. सततच्या पावसामुळे रोपेदेखील मोठ्या प्रमाणावर सडू लागली आहेत. शेतकर्‍यांनी रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणी सुरू केली आहे. रोगांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, शेतकरी या नव्या संकटामुळे चिंतेत सापडले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, नागापूर, रांजणी परिसरात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी घेतले आहे. परंतु, सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा फटका बटाटा पिकाला बसला. त्यानंतर उष्णतेचाही परिणाम बटाट्यावर झाला.

संबंधित बातम्या :

आता सततच्या जोरदार पावसानेही बटाट्याला झोडपून काढले आहे. त्यातच ढगाळ व उष्ण वातावरणामुळे आता बटाटा पिकावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी महागड्या औषधांची फवारणी बटाटा पिकावर सुरू केली आहे. मात्र सततच्या पावसाचे पाणी पिकात साचून राहिल्याने बटाटा रोपे सडू लागली आहेत. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदा बटाट्याचे उत्पन्न घटणार असल्याची शक्यतादेखील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

भांडवल वसूल होणे कठीण
यंदा पाऊस कमी असतानादेखील मोठ्या धाडसाने बटाटा पीक घेतले. त्यासाठी मोठे भांडवलदेखील गुंतविले. परंतु, पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका बटाट्याला बसला. त्यानंतर उष्णतेमुळे लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव बटाट्यावर झाला आणि आता दररोज जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी बटाट्याच्या पिकात साचून राहत आहे. त्यामुळे रोपे सडू लागली आहेत. त्यामुळे उत्पादन घटून गुंतविलेले भांडवल वसूल होणे कठीणच असल्याचे रांजणी येथील बटाटा उत्पादक शेतकरी शशिकांत भोर यांनी सांगितले.

Back to top button