पिंपरी : कोट्यवधींच्या व्यायाम साहित्याची लागतेय वाट | पुढारी

पिंपरी : कोट्यवधींच्या व्यायाम साहित्याची लागतेय वाट

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने व्यायामशाळा तसेच, पदपथ, उद्यान, मोकळा जागा आदी ठिकाणी सरसकट जीमचे (व्यायामाचे) साहित्य बसवले जात आहे. एकदा जीमचे साहित्य लावले की, त्याकडे पालिकेचा संबंधित विभाग ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे ते साहित्य काही महिन्यांतच खराब होत आहे. त्याचा वापर होत नाही. काही साहित्य गायब होते. यावरून केवळ खरेदीसाठीच क्रीडा विभागाकडून कोट्यवधीचा खर्च केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या एकूण 89 व्यायामशाळा आहेत. प्रतिसाद नसल्याने 36 व्यायामाशाळा बंद अवस्थेत आहेत. त्या व्यायामशाळा महापालिका प्रशासनाकडून चालविल्या जात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. चालू असलेल्या व्यायामशाळांसाठी 23 संच इनडोअर जीम साहित्य गेल्या वर्षी 18 सप्टेंबरला खरेदी करण्यात आले. त्यासाठी तब्बल 5 कोटी खर्च करण्यात आला. आता उर्वरित 11 संच त्याच ठेकेदाराकडून गेल्या महिन्यात खरेदी करण्यात आले. त्यासाठी तब्बल 2 कोटी 68 लाख 16 हजार खर्च करण्यात आला. त्या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची 26 सप्टेंबरला मान्यता दिली. तर, खरेदी आदेशाची मुदत 27 सप्टेंबरपर्यंत होती.

इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करूनही अनेक व्यायामशाळेत साहित्य नसल्याचे चित्र आहे. साहित्य तुटल्याचे किंवा गायब झाल्याची तक्रार व्यायामासाठी येणारे नागरिक करीत आहेत. नाईलाजास्तव खासगी क्लब पदरचा खर्च करून जीमचे नवनवीन साहित्य उपलब्ध करून देत आहेत.

या प्रकारे उद्यान, पदपथ, मोकळी जागा या ठिकाणी जीमचे साहित्य बसविण्याचा धडाका महापालिकेने सुरू केला आहे. दिसेल, तेथे जीमचे साहित्य बसविण्याचा सपाटा सुरू आहे. माजी नगरसेवकांच्या मागणीवरून दिसेल, तेथे ओपन जीमचे साहित्य बसविले जात आहे. त्यासाठी 2 कोटी 50 लाखांचे साहित्य गेल्या वर्षी खरेदी करण्यात आले. ही खरेदी सातत्याने सुरूच आहे. या साहित्याचा दर्जा सुमार असल्याने ते काही महिन्यांतच तुटते. तर, अनेक साहित्य चोरीला गेले आहेत. साहित्य चोरून भंगारात विकण्याचे प्रकार घडत आहेत.

नादुरुस्त जीमवर नागरिक व लहान मुले व्यायाम करतात. तुटलेले लोखंडी साहित्य लागून जखम होण्याची शक्यता आहे. तसेच, पदपथ, उद्यान व मोकळ्या जागेत लावलेल्या साहित्यभोवती राडारोडा पडलेला असतो. चिखल झालेला असतो. खड्डे पडलेले असतात. अस्वच्छता आणि घाणीचे साम—ाज्य असल्याने नागरिक त्यांचा वापर टाळतात. दरम्यान, खरेदी केलेले जीमचे काही साहित्य उद्यान विभागात पडून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

जीमचे साहित्य चोरीचे प्रकार

निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक परिसरातील जॉगिंग ट्रॅकवरील जीमचे साहित्य चोरीला गेल्याचे तक्रार करण्यात आली होती. पिंपळे गुरव व सांगवी येथील जीमचे काही साहित्य गायब झाले आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरात तब्बल 27 ठिकाणी जीमचे साहित्य लावले होते. ते सर्व साहित्य गायब झाले असून, त्यांचा शोध महापालिकेचा क्रीडा विभाग घेत आहे.

तक्रारी करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष

देखभाल व दुरुस्तीसह जीमचे साहित्य महापालिकेकडून खरेदी केले जाते. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला अधिकचा दर दिला जातो. मात्र, एकदा साहित्य लावल्यानंतर ते नादुरुस्त किंवा खराब झाले तरी, त्याकडे पाहिले जात नाही. सुमार दर्जाचे हे साहित्य काही महिन्यांतच तुटते किंवा खराब होते. वारंवार तक्रारी करूनही नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे व्यायाम करताना दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

क्रीडा विभागाच्या मागणीनुसार जीमच्या साहित्यांची खरेदी

क्रीडा विभागाकडून मागणी केल्यानुसार जीमचे साहित्य खरेदी केले जाते. निधी कमी असल्याने जुन्या ठेकेदाराकडून आता इनडोअर जीमचे उर्वरित साहित्य खरेदी करण्यात आले, असे महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

हेही वाचा

बटाट्यावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव

बेळगाव : अहो, इथे लोकवर्गणीतून साकारतोय पूल!

Pimpri News : पिंपरीतील ’दादा’,’भाई’ वर कारवाई; फॅन्सी नंबर प्लेट लावल्याने1 कोटी 27 लाखांचा दंड वसूल

Back to top button