तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जंगी स्वागत | पुढारी

तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जंगी स्वागत

ओझर : पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सोमवारी (दि. 2) प्रथेप्रमाणे नारायणगाव येथे आगमन झाले. या वेळी नारायणगाव ग्रामस्थ व तिळवण तेली समाजाने साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे उत्साहात स्वागत केले. भाविकांची दर्शन, आरती व महाप्रसादासाठी गर्दी झाली होती. शिवाजी चौक परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघाला होता.तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा मान तिळवण तेली समाजाला देण्यात आलेला आहे. रात्री देवीला महाअभिषेक, महाआरती व देवीचा जागरण गोंधळ घालण्यात आला. रात्री उशिरा संबळवादकांनी देवीस मानवंदना दिली.

संबंधित बातम्या :

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे युवानेते अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, भाजप तालुकाध्यक्ष संतोष खैरे, आशिष माळवदकर, नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे, लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट तिळवण तेली समाज अध्यक्ष महेश वालझाडे, उपाध्यक्ष सुदीप कसाबे, कार्याध्यक्ष अनिल तात्या दिवटे, विश्वस्त संजय कसाबे, संचालक सुशांत दिवटे, बाळासाहेब दळवी, प्रणव भुसारी, उल्हास वालझाडे, विष्णुमामा दळवी, विशाल मावळे, दत्तात्रय मावळे, हरिश दिवटे, सतीश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

पलंग बनविण्याचा मान ठाकूर कुटुंबीयांना
तुळजाभवानी मातेचा पलंग बनविण्याचा मान मूळचे घोडेगाव (भीमाशंकरजवळ) पण सध्या पुण्यात स्थायिक असणारे ठाकूर (कातारी) कुटुंबीयांना आहे. हा मान त्यांना राजमाता जिजाऊंच्या नवसपूर्तीमुळे शहाजीराजे यांनी दिला. देवीचा पलंग बनविण्यासाठी आंबा व सागवान लाकूड, रंग, लोखंडी खिळे, पट्टी, दोरखंड, गादीसाठी कापूस, छताकरिता कापड हे साहित्य अहमदनगर येथील पलंगे (तेली) घराण्याकडून ठाकूर कुटुंबीयांना पुरविले जाते. ठाकूर कुटुंबीयांनी तयार केलेले पलंगाचे भाग घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील भागवत कुटुंबाकडे सुपूर्त केले जातात. कुठलीही विश्रांती न घेता भागवत कुटुंब श्रावण शुद्ध षष्टी ते श्रावण शुद्ध सप्तमीपर्यंत जोडून देवीचा पलंग पूर्ण करतात.

Back to top button