मुबलक साठा असूनही तळेगावातील पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

मुबलक साठा असूनही तळेगावातील पाणीपुरवठा विस्कळीत

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सुस्त आणि गलथान कारभारामुळे शहराकरिता मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना सध्या पाण्यासाठी दररोजच चातकासारखी वाट पाहवी लागत आहे.

पाण्यासाठी नागरिकांची वणवण

तळेगाव शहराला पवना आणि इंद्रायणी नदीवरील पाणीपुरवठा योजनांमधून दररोज पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेच्या वतीने सोमाटणे येथील पवना नदीतून दररोज 16 एमएलडी पाणी शहरासाठी उचलले जाते. तर, इंद्रायणी नदीतून 8 एमएलडी पाणी उचलले जाते. एवढा शहराकरिता मुबलक पाणीसाठा असूनही शहरातील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

प्रशासकीय राजवटीवर नागरिकांची नाराजी

वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, पंप जळणे, पाइप फुटणे, वेळेवर पाणी न सोडणे आदी कारणांमुळे भरपूर पाणी असूनदेखील नागरिकांना पाणी मिळत नाही. यास प्रशासकीय राजवट मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. गेली दोन वर्षे माजी लोकप्रतिनिधी व भविष्यात होणारे लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराकडे फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासनाचे फावले असल्याचे संतप्त नागरिक मत व्यक्त करत आहेत.

मूलभूत समस्यांपासून नागरिक वंचित

तळेगाव स्टेशन भाग व गाव भागात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये कचरा, पाणी, रस्ते, गटार, रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, उद्यानांची देखभाल, नगर परिषदेच्या इमारतीमध्ये असलेली अस्वच्छता आदी बाबींचा समावेश आहे. याकडे प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांना केला आहे.

पाणीपट्टीतून कर कमी करणार का ?

गेली अनेक दिवस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे. हा झालेला खर्च नगर परिषद पाणीपट्टीतून कमी करणार का? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहे.

हेही वाचा

देहूगाव : संततधार पावसाने सोयाबीन पीक धोक्यात

बटाट्यावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव

Pune News : खेडमधील 25 गावांत वाजणार दिवाळीपूर्वी फटाके

Back to top button