

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील 25 गावांच्या ग्रामपंचायतीचे नवे कारभारी निवडायचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या गावांमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. गेली दीड ते दोन वर्षे ग्रामपंचायत निवडणुका रखडल्या होत्या. मतदारांना सांभाळून इच्छुक कंटाळले होते. अखेर राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी (दि. 3) निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर निवडणूक होणार्या गावात चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
संबंधित बातम्या :
निवडणूक प्रक्रिया दसरा-दिवाळीच्या काळात होणार आहे. मतदारांची चंगळ होणार आहे, तर प्रत्यक्ष दिवाळी सुरू होण्याआधी आठवडाभर अगोदर निकालाच्या माध्यमातून विजयाचा गुलाल आणि फटाके फुटून दिवाळी साजरी होणार आहे.
निवडणूक होणार्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : राजगुरुनगर शहरालगत असलेल्या सांडभोरवाडी, सातकरस्थळ, कोहिनकरवाडी, होलेवाडी तसेच चाकण परिसरातील निघोजे, संतोषनगर, वाकी बुद्रुक, पश्चिम भागातील तिफनवाडी, वाळद, डेहणे, धुवोली, सुपे, वाघु, आडगाव, वहागाव, देशमुखवाडी, कोळीये, गोरेगाव, एकलहरे, भोमाळे, मोरोशी, परसुल तर पूर्व भागातील पिंपळगाव तर्फे खेड, वरुडे आणि गाडकवाडी.