बेळगाव : अहो, इथे लोकवर्गणीतून साकारतोय पूल!

जमखंडी; पुढारी वृत्तसेवा : आधीच मूळ गावातून विस्थापन. नंतर विकास योजना राबवा म्हणून वारंवार विनंत्या केल्या तरी विकास शून्य. गावात पोचण्यासाठी पूलही नाही, अशी गेल्या दहा वर्षांपासूनची अवस्था. त्यावर तोडगा म्हणून आता गावकर्यांनीच नदीवर पूल बांधत शासनाला चपराक दिली आहे.
जमखंडीपासून 10 किमीवर कंकणवाडी हे कृष्णा नदीकाठचे गाव. दोनशेहून अधिक कुटुंबे व जवळपास अडीचशे गुरे येथे राहतात. रोज पंधराशे लिटर दुधाची वाहतूक नदी पार करून करावी लागते. येथील 40 विद्यार्थ्यांना रोज शाळेला जाण्याकरिता नदी ओलांडावी लागते. पूर्वी कोणतेही साधन नसल्याने पोहून, तर अलीकडे बोटीच्या मदतीने नदी पार करण्यात येत असे. पण, बोट वेळेवर उपलब्ध न होणे, कधी नादुरुस्त असणे असे प्रकार होत होते. त्यामुळे कृष्णा नदीवर पूल उभारणी करण्यासाठी संबंधित अधिकार्यापासून स्थानिक आमदार, मंत्री ते मुख्यमंत्र्यापर्यंत अनेकवेळा विनंती अर्ज करण्यात आले.
तथापि, शासनाने दखल घेतली नसल्याने अखरे लोकवर्गणीतून बॅरल पूल निर्मितीचे काम हाती घेतल्याची माहिती कंकणवाडी गावकरी सदाशिव कवटगी, मल्लाप्पा सिद्धनावर, रुद्राप्पा जगदाल, रामाप्पा जगदाल आदींनी दिली.
25 लाख निधी जमा
बांगलादेशमध्ये बॅरल पूल बांधण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर गावकर्यांना मिळाली. असाच पूल आपणही कृष्णा नदीवर उभारावा यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले. या कामाकरता लागणारा अंदाजे 25 लाख रुपये निधी वर्गणीद्वारे जमा करण्यात आला. 300 बॅरल, 13 टन लोखंड, लाकडी फळ्या, मोठे दोरखंड असे साहित्य विकत आणून हा पूल साकारण्यास प्रारंभ करण्यात आला.
पूल 500 मीटर लांब 8 फूट रुंद होत असून कृष्णा नदीच्या दोन्ही काठावर खडी, माती टाकून रस्ता करण्यात येत आहे. या पुलामुळे कृष्णा नदी ओलांडणे सुलभ होणार आहे. येथून दुचाकीवरून तीन ते चार क्विंटल वाहतूक करणे शक्य होणार असल्याची माहिती गावकर्यांनी दिली.
आधीच अलमट्टी योजनेत बुडितग्रस्त असलेला हा परिसर. त्यात धरणाची उंची वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याने या भागात सरकार कोणत्याही नव्या योजना राबविण्याएस नकार देत असल्याचेही गावकर्यांनी सांगितले.