Pune News : पुराबाबत खोटी माहिती; तावशीतील युवकावर गुन्हा | पुढारी

Pune News : पुराबाबत खोटी माहिती; तावशीतील युवकावर गुन्हा

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा :  तावशी (ता. इंदापूर) येथील युवकाने 112 क्रमांकावर फोन करून नीरा नदीला आलेल्या पुरात  तिघेजण वाहून गेल्याची खोटी माहिती दिली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दत्तात्रय नामदेव गायकवाड   (वय 38, रा. तावशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड याने सोमवारी (दि. 2) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास  शासकीय तक्रार सुविधा डायल 112 क्रमांकावर फोन करून तावशी गावच्या हद्दीत नीरा नदीला पूर आला असून, मासे पकडणारे तिघेजण वाहून गेले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका व पोलिस पाठवा, असे सांगितले.
संबंधित बातम्या :  
सदर माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तावशीमध्ये कर्मचारी पाठवले. मात्र, तावशीमध्ये नीरा नदीला पूर आला नव्हता. तसेच कोणीही वाहून गेलेले नसल्याची माहिती मिळाली. गायकवाड याच्याकडे पोलिसांनी खोटी माहिती का दिली याबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत आरडाओरडा केला.  पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता  त्याने  मद्यप्राशन केल्याचे आढळले.  याप्रकरणी गायकवाडवर खोटी माहिती देऊन सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी सांगितले.

Back to top button