Pune news : मराठी कधीही नामशेष होणार नाही; डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन | पुढारी

Pune news : मराठी कधीही नामशेष होणार नाही; डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठी कधीही नामशेष होणार नाही. दोन हजार वर्षांपासून बोलली जाणारी, लिहिली जाणारी ही भाषा अजून संपलेली नाही. त्या त्या काळातील आक्रमणांवर मात करीत मराठी अधिक समृद्ध झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. आपण इंग्लिश विग्लिंश हा प्रकार मानतो. पण, ते तेवढ्यापुरतेच आहे. मराठीची वेगवेगळी रूपे मराठी वाचकांना, जाणकारांना, समाजाला आजही अधिक आकृष्ट करतात. त्यामुळे मराठीला कधीही मरण नाही, असे मला वाटते, असे प्रतिपादन 97 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.

दिलीपराज प्रकाशनच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक’ पुरस्कार नाशिक येथील ज्येष्ठ ग्रंथवितरक वसंत खैरनार यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी डॉ. शोभणे बोलत होते. लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे आणि मधुर बर्वे आदी उपस्थित होते. लेखक एकनाथ आव्हाड यांना बालसाहित्यासाठीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. शोभणे म्हणाले की, लेखकांनी लिहिले तर प्रकाशक ते प्रकाशित करतील आणि प्रकाशकांनी प्रकाशित केले तरच लेखक लिहिते राहतील. असे लेखक-प्रकाशक यांचे नाते परस्परपूरक आहे. मराठी साहित्यविश्वात या नात्याला दीर्घ परंपरा लाभली आहे. प्रत्येक प्रकाशकाची पुस्तके प्रकाशित करण्यामागील भूमिका, शैली आणि जातकुळी वेगळी असते. त्यानुसार लेखकांची निवड प्रकाशकाद्वारे केली जाते.

डॉ. जावडेकर म्हणाले की, कालसुंगत मार्केटिंग करण्यात आजही काही प्रकाशक मागे आहेत. मार्केटिंगचे काही प्रकाशकांना वावडे आहे. पुस्तकांच्या मार्केटिंगला नावे ठेवू नका. मार्केटिंग न केल्यामुळे अनेक प्रकाशनगृहे आज मागे पडली आहेत. प्रत्येक प्रकाशकाने पुस्तकांच्या मार्केटिंगकडे भर दिला पाहिजे. आज भारतात बालसाहित्याची उपेक्षा आणि अवहेलनाच अधिक केली जाते. बालवाचक वाचनाच्या कक्षेत आल्यानंतर त्याच्या वयाच्या विविध टप्प्यांवरचा तो आपला भविष्यातील वाचक आहे, याचे भान आणि समज अद्याप भारतात रुजलेली आणि विकसित झालेली नाही. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 हेही वाचा

डाळिंब चोरीच्या उद्देशाने त्यांनी पसरवली बिबट्या आल्याची अफवा

Chatrapati Sambhaji Nagar : विद्यापीठात होणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र

Pune News : गणेशोत्सवामध्ये कानाला दुखापत; पुण्यातील वकिलाची प्रशासनाला नोटीस!

Back to top button