Pune News : अखेर गराडे धरण ओव्हरफ्लो | पुढारी

Pune News : अखेर गराडे धरण ओव्हरफ्लो

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील गराडे 100, माहूर 100 आणि वीरनाला धरण 96 टक्के भरले आहे.
सासवड शहराला वीर, गराडे, सिद्धेश्वर जलाशय व घोरवडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गराडे धरण 65.37 दशलक्ष
घनफूट क्षमतेचे असून, हे धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे सासवड शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे. गराडे धरणातून क-हा नदीत विसर्ग सुरू झाला आहे, तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्‍यांत विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग सुरू होईल, असे पाटबंधारे शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी सांगितले.

गराडे धरणातून गराडे, कोडीत बुद्रुक व खुर्द, चांबळी व हिवरे आदी गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. सासवड शहर, कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरे आदींसह इतर वाड्या-वस्त्यांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. कऱ्हेचे उगमस्थान चतुर्मुख महादेव मंदिर दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात संततधार पावसामुळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कर्‍हेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, असे सासवड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.

एका आठवड्यातील पाऊस
बुधवार (दि. 27) सप्टेंबर ते मंगळवार (दि. 3 ऑक्टोबर) पर्यंतची तालुक्यातील पावसाची आकडेवारी : सासवड 72 मिलिमीटर, जेजुरी 112, भिवडी 52, परिंचे 73, राजेवाडी 38, वाल्हा 95, तर कुंभारवळण येथे 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती पुरंदर तहसीलमधील लिपिक योगेश बंगले यांनी दिली.

जलाशयातील पाणीसाठा
तलाव साठवण क्षमता (दशलक्ष घनफूट) टक्केवारी
गराडे 65.37 100
घोरवडी 67.50 8
पिंगोरी 20 27
पिलाणवाडी 69.22 53
माहूर 84 100
वीरनाला 90.21 96

पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याची काटकसर करून सासवड नगरपरिषदेला सहकार्य करावे. गावठाण, हाडको, नारायणनगर, वाढीव हद्द, विविध सोसायट्या आदींचे वेळापत्रक स्थानिक पातळीवर सुरू आहे. येथून पुढे पाऊस येईल, की नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे
                           -डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद

 

 

Back to top button