नांदेड, संभाजीनगरच्या घटनेनंतर नाशिक महापालिका अलर्ट | पुढारी

नांदेड, संभाजीनगरच्या घटनेनंतर नाशिक महापालिका अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठाण्यातील कळवा रुग्णालयापाठोपाठ नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयांतील मृत्यूच्या तांडवानंतर नाशिक महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमधील औषधसाठ्याचा तातडीने आढावा घेतला असून, नाशिक जिल्हा रुग्णालयातील शॉर्टसर्किटच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल तसेच स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाण्यातील महापालिकेच्या कळवा रुग्णालयात गेल्या आॅगस्ट महिन्यात ३ दिवसांत २७ रुग्णांनी आपला जीव गमावल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला, तर पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दोन नवजात बालकांसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शॉर्टसर्किटची घटना घडल्याचे समोर आले आहे. शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेची आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी जायभावे यांनी मंगळवारी

(दि. 3) आरोग्य व वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत महापालिकेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा-सुविधांचा आढावा घेतला. नाशिकरोड येथील दोनशे खाटांचे बिटको रुग्णालय, दीडशे खाटांचे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, ५० खाटांचे मोरवाडी रुग्णालय, पंचवटील इंदिरा गांधी रुग्णालय तसेच सातपूर येथील मायको रुग्णालयातील औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपलब्धता याची माहिती घेतली. या रुग्णालयांमध्ये सुमारे दोन महिने पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असून, ज्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे, अशा ठिकाणी उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून पूर्तता करण्याचे निर्देश डॉ. चव्हाण यांनी दिले.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सतर्क

शहरात आधीच डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे २६१ रुग्ण आढळले आहेत. तर चिकुनगुणियानेही दस्तक दिली आहे. मलेरिया आणि तापाच्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. व्हायरल तापाने अर्धे शहर आजारी असून, सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये फुल्ल आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिटको रुग्णालयात स्वतंत्र बालरोग विभाग असून त्याचीही सज्जता ठेवून या ठिकाणी पुरेसे बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असतील याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नांदेड, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेच्या महापालिकेच्या रुग्णालयांतील आरोग्य सुविधा आणि औषधसाठ्याचा आढावा घेतला आहे. सद्यस्थितीत पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्सची उपलब्धता करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

हेही वाचा :

Back to top button