Pune News : गणेशोत्सवामध्ये कानाला दुखापत; पुण्यातील वकिलाची प्रशासनाला नोटीस! | पुढारी

Pune News : गणेशोत्सवामध्ये कानाला दुखापत; पुण्यातील वकिलाची प्रशासनाला नोटीस!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवामध्ये डीजे आणि साउंड सिस्टिममुळे कानाला दुखापत झाली असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी नोटीस पुण्यातील वकिलाने प्रशासनाला बजावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ ठरल्याने माझ्या उजव्या कानाला गंभीर दुखापत झाल्याचा दावा अ‍ॅड. योगेश पांडे यांनी केला आहे.

गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी दिली होती. त्याच परवानगीचा फायदा घेत डीजे आणि साउंड सिस्टिमच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना त्रास झाला. पांडे यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये उजव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, त्यासाठी पैसे खर्च झाल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, वेळीच धावपळ करत उपचार सुरू केल्याने आणि औषध लागू झाल्याने बर्‍यापैकी आता सुधारणा झाली असून, संभाव्य धोका जवळपास टळला असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. उजव्या कानात शिट्टी, हवेसारखा मोठा आवाज सतत येत असल्याने त्या बाजूने काहीही ऐकू येत नव्हते. कानातील आवाजामुळे पाच ते सहा दिवस झोपसुद्धा नव्हती. कोणतीही चूक नसताना घरातील इतर सर्वांनाच सोसावे लागल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.

याचिका दाखल करणार

पुण्यामध्ये ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले. याचा पुणे महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना नोटीस देऊन ध्वनिप्रदूषणाबद्दल जाब विचारला आहे. दरम्यान, याच प्रश्नासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. पांडे यांनी सांगितले.

डॉल्बीच्या आवाजामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. छोटी मुलं, वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. तर कानामध्ये कर्णनादचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांमध्येदेखील वाढ झाली. त्याचबरोबर मानसिक त्रास, चिडचिडेपणाचे रुग्ण मागील आठ ते दहा दिवसांमध्ये वाढले आहेत. विशेषतः डीजेच्या भिंतीजवळ उभे असलेल्या मुलांना त्या वेळी काही वाटत नाही, मात्र दुसर्‍या दिवशी जाणवते आपण काय केले. कानाच्या पडद्यांना गंभीर इजा होण्याचे प्रकार यामुळे झाले आहेत.
डॉ. मिलिंद भोई, कान-नाक-घसा तज्ज्ञ

मिरवणुकीनंतर कानाचे रुग्ण येत आहेत. काहींना तर चक्कर आल्याने खाली पडले होते, त्यांना उचलून काहीजण घेऊन आले होते. कानाच्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत. त्यामध्ये सर्व वयोगटांतील व्यक्तींचा समावेश आहे. डीजेपुढे असलेल्यांना अधिक त्रास झाला असल्याचे रुग्णांकडे चौकशी केल्यानंतर जाणवते.

डॉ. सिद्धार्थ शिंदे

हेही वाचा

Nashik Leopard : त्र्यंबकेश्वर शहरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

पुणे जिल्ह्यात गुलाल उधळणार; 231 ग्रामपंचायत निवडणुकांचे वाजले बिगुल

नांदेड, संभाजीनगरच्या घटनेनंतर नाशिक महापालिका अलर्ट

Back to top button