Pune Water News : एक टीएमसी पाणी जाणार वाया…का? बैठक व्हायचीय!

Pune Water News : एक टीएमसी पाणी जाणार वाया…का? बैठक व्हायचीय!

पुणे : अखेरच्या टप्प्यातील पावसाच्या समाधानकारक हजेरीने शेतीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याची गरज उरलेली नसतानाही केवळ कालवा सल्लागार समितीची बैठक नसल्याने तब्बल एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी हकनाक वाया जाणार आहे. या बैठकीची वाट न पाहता पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिल्यास पुण्याच्या पिण्याचे जवळपास पाऊण महिन्याचे किंवा सिंचनाचे पंधरवड्याचे पाणी वाचेल. यासंदर्भात पुण्यातील अनेक आमदारांनी पालकमंत्र्यांना तशी विनंती केल्याने आता चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात आहे.

खडकवासला धरणासाखळीतील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे वरसगाव, पानशेत, खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळी नऊपर्यंत गेले चार दिवस मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. टेमघर धरण 80 टक्के भरले आहे. तेथे पाणीसाठा कमी झाल्यामुळे, साखळी धरणातील एकूण साठा थोडा कमी झाला आहे. खडकवासला प्रकल्पात मंगळवारी सायंकाळी 28.41 टीएमसी (97.46 टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. कालपासून पाऊस कमी झाल्याने, धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे.

जूनपासून ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण कमी असल्याने, शेतकर्‍यांनी कालव्यातून खरीप हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. 27 जुलैपासून कालव्यातून सिंचनासाठी आवर्तन सुरू करण्यात आले. सप्टेंबरमध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत 15 ऑक्टोबरपर्यंत कालवा सुरू ठेवण्याचे ठरले. त्यावेळी 31 ऑगस्ट रोजी प्रकल्पात 27.60 टीएमसी (94.68 टक्के) पाणीसाठा होता.

सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी पुरविल्यास प्रकल्पात 15 ऑक्टोबरला 17.16 टीएमसी पाणी राहील, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला होता. आठ सप्टेंबरला पाणीसाठा 27.15 टीएमसी (93.13 टक्के) पर्यंत कमी झाला होता. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत सिंचनासाठी आणि पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी दोन टीएमसी पाणी वापर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, 15 ऑक्टोबरला धरणसाखळीत 26.40 टीएमसी पाणी शिल्लक राहील.

गेली दोन वर्षे वगळता 27 टीएमसीपेक्षा अधिक पाणी शिल्लक राहत होते. गेल्या वर्षी 29 टीएमसी पाणी शिल्लक असतानाही उन्हाळ्यात पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या वर्षी पाणीवाटपाचे नियोजन नीट करण्याची पुणे शहरातील आमदारांची मागणी आहे. गेल्या तीन वर्षांत 35 ते 64 दिवस एवढे पाणी खरीप हंगामात देण्यात आले होते.

यंदा आजपर्यंत 68 दिवस, तर 15 ऑक्टोबर पर्यंत 80 दिवस पाणी पुरविले जाणार आहे. गेल्या दहा दिवसांत प्रकल्पाचा लाभक्षेत्रात विशेषतः दौंड तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे, सध्या धरणातून कालव्याद्वारे देणारे पाणी थांबविल्यास, त्याला फायदा रब्बी हंगामात पाणी देण्यासाठी होऊ शकतो. येत्या तेरा दिवसांत सुमारे सव्वा टीएमसी पाणी कालव्यातून सोडण्यात येणार आहे. धरणांत कमी पाणी राहिल्यास, उन्हाळ्यात अडचण येण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वत्र या पंधरवड्यात पुरेसा पाऊस पडला आहे. मात्र, यंदा पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांत पाणीसाठा तुलनेने कमी झाला आहे. ते लक्षात घेऊन आत्तापासूनच पुणे शहराचा पाणीपुरवठा, ग्रामीण भागातील पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी आणि औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज विचारात घेऊन पुढील वर्षभर पाणी वापर कसा करायचा? याबाबत संतुलन ठेवत लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

– सिद्धार्थ शिरोळे, आमदार

खडकवासला धरणातून गेले दोन महिने कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीच्या परिसरात गेल्या पंधरवड्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे खरिपाचे आवर्तन आत्ता थांबविल्यास धरणात सुमारे एक टीएमसी पाण्याची बचत होईल. ते पाणी पुढे शेतीसाठीच वापरावे. त्यासाठी कालव्यातून 15 ऑक्टोबरपर्यंत आवर्तन देण्याऐवजी ते तातडीने थांबविले पाहिजे.

– भीमराव तापकीर, आमदार

सध्या खडकवासल्यातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले जात आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतीमध्ये चांगला पाऊस पडला आहे. कालवा सल्लागार समितीने 15 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरीप पिकासाठी आवर्तन सुरू ठेवले आहे.

– श्वेता कुर्‍हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news