पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी कैदी ललित पाटील याला ड्रग्ज विक्रीतून बारा लाख रुपये मिळणार होते. ते पैसे घेण्यासाठी जर्मन नावाचा व्यक्ती चाकण परिसरात येऊ थांबला होता. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत त्याचा डाव उधळला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे हे पथकासह पुणे स्टेशन परिसरात शनिवारी गस्तीवर होते.
या वेळी एक व्यक्ती ससून हॉस्पिटल परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळाली. दरम्यान, ससून हॉस्पिटलसमोर बस स्टॉपलगत सुभाष मंडल हा बॅगसह थांबलेला दिसला. त्याची झडती घेतली असता 1 किलो 71 ग्रॅम 53 मिलिग्राम मेफेड्रोन हा पदार्थ आढळला. त्याची चौकशी केली असता हा अमली पदार्थ ससून हॉस्पिटल वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचारांसाठी येरवडा कारागृहातील दाखल असलेला कैदी ललित पाटील याने ससून हॉस्पिटल कॅन्टीन कामगार रौफ शेख याच्यामार्फत विक्रीसाठी पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पकडलेल्या मेफेड्रॉनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 2 कोटी 14 लाख 30 हजार रुपये आहे.
दरम्यान, रविवारी (दि. 1) रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथील ललित पाटील याच्या घरी धडक दिली. मात्र तेथे त्याचे कोणी नातेवाईक राहत नसल्याचे निदर्शनास आले असून, घर बंद असल्याचे दिसले. पोलिसांना या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, त्या अनुषंगाने ते तपास करत आहेत. पोलिसांना ललितकडे दोन मोबाईल मिळून आले आहेत. त्यामधील सीम कार्ड ही त्याचा भाऊ भूषण अनिल पाटील याने घेऊन दिली आहेत.
नाशिक येथील सीम कार्ड विक्री करणार्या व्यक्तींच्या नावावर ती कार्ड आहेत. त्याने अशाप्रकारे दोन ते तीन सीम कार्ड खरेदी केली होती. जेव्हा पोलिसांनी ललित याच्याकडे ड्रग्ज प्रकरणी चौकशी केली तेव्हा त्याच्या मोबाईलवर सतत जर्मन या नावाने फोन येत होता. पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा जर्मन हा दुसरा तिसरा कोणी नसून ललित याचा भाऊ भूषण असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
ससून ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित अनिल पाटील हा स्वतः मेफेड्रॉन (एम डी) तयार करत होता. 2020 मध्ये चाकण येथे 16 किलो एम डी जप्त करण्यात आले होते. त्या गुन्ह्यात ललित पाटील आरोपी असून तेव्हापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सोमवारी (2 ऑक्टोबर) ला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुभाष जानकी मंडल (वय-29, रा. देहूरोड, मूळ झारखंड ) आणि रौफ रहीम शेख (वय-19, रा. ताडिवाला रस्ता) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ललित अनिल पाटील हा मुख्य आरोपी असून, तो सध्या ससून रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेत आहे.
हेही वाचा