

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील घुलेपट शिवारात दुचाकीवरून आपल्या घरी जाणार्या चालत्या दुचाकीवरील पती-पत्नीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्यामुळे दोघेही जखमी झाल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. रविवारी (दि. 1) रात्री साडेसातच्या सुमारास ही हल्ल्याची घटना घडली असून, या घटनेत गंगाराम तांबे (वय 50) व त्यांची पत्नी मनीषा (वय 45, रा. ओतूर ,घुलेपट) हे जखमी झाले आहेत.
संबंधित बातम्या :
घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक सुदाम राठोड, विश्वनाथ बेले, किसन खरोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात त्वरेने पिंजरा लावला आहे. घुलेपट परिसर हा बिबटप्रवण क्षेत्रात येत असल्याने नागरिकांनी रात्रीच्या सुमारास पुरेशी विजेचीची व्यवस्था करावी, एकट्याने फिरू नये, सोबत बॅटरी बाळगावी, मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावीत, पशुधन बंदिस्त गोठ्यातच ठेवावे, अशा सूचना वन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.