पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : समाजातील चुकीच्या चालिरिती बदलण्याची तयारी ठेवा. व्यसने सोडा. समाजाची सामूहिक शक्ती दाखवून द्या. सरकार मेहबानी करत नाही. आपले अधिकार मिळवा. तशी तयारी करा. न्याय पदरात पाडून घ्या, असे आवाहन लोकनेते खासदार शरद पवार यांनी भटके विमुक्त समाजाला सोमवारी (दि.2) दापोडी येथे केले.
भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने खा. शरद पवार यांना ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते 'समाजरत्न' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भारत जाधव, डॉ. शिवलाल जाधव, व्यंकय्या भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील व भटक्या विमुक्त प्रतिष्ठान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले की, आजच्या राजकर्त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते आदिवासींना वनवासी म्हणतात. जंगलाचे ते खरे मालक आहेत. मूळ संस्कृतीचे घटक आहेत. त्यांना पूजाअर्चा करण्यास सांगितले जात आहे. भटक्या, विमुक्त, वंचित समाज घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्वीचे राजकर्ते पुढे येत. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सोलापूर येथे येऊन या समाजावरील गुन्हेगार हा शिक्का
पुसला. पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यासाठी कायदे केले. समाजाला सवलत आणि आरक्षण आमच्या काळात देण्यात आले.
नव्या पिढीने पुढे येऊन समाज सुधारण्याची जबाबदारी घ्यावी. शिक्षण, शेती आदी क्षेत्रात संघटीत होऊन विधायक काम करावे. प्रश्न आणि अडथळ्याची सोडवणूक करण्यासाठी खरबदारी घ्या. एकी ठेवावी. सामूहिक शक्तीनिशी प्रश्न मांडा. मी आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही पवार यांनी दिली. दरम्यान, विविध संघटना व संस्थांकडून पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना अनेकांनी विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले. भारत जाधव यांनी स्वागत केले. डॉ. शिवलाल जाधव यांनी प्रास्ताविक केले. विजय जाधव यांनी
आभार मानले.
देशाची जनगणना जातनिहाय व्हावी, अशी जुनी मागणी आहे. त्याबाबत आम्ही संसदेत अनेकदा मागणीही केली आहे. त्यामुळे कोणत्या जातीची व समाजाचे किती लोक आहेत, ते स्पष्ट होईल. लोकांना कळेल. लोकसंख्येनुसार त्या त्या समाजासाठी सरकारला काम करता येईल, असे खा. शरद पवार म्हणाले.
हेही वाचा