खानापूर : पुढारी वृत्तसेवा : यडोगा (ता. खानापूर) नदी पुलावर दुचाकी सोडून बेपत्ता झालेला संपतकुमार निंगाप्पा बडगेर ( वय २४, रा. कोडचवाड ) हा तरुण आदिलाबाद (तेलंगणा) येथे सापडला आहे. तो सुस्थितीत असून खिशात पैसे नसताना तो तेलंगणापर्यंत कसा पोहोचला? याचा आज उलगडा होणार आहे.
संबधित बातम्या
दहा दिवसानंतरही बेपत्ता संपतकुमार याचा शोध न लागल्याने पोलीस बुचकळ्यात पडले होते. रविवार ( दि. २४) पासून संपतकुमार बेपत्ता झाला होता. त्याच दिवशी सायंकाळी त्याची दुचाकी यडोगा पुलाजवळ झुडपात आढळून आली होती. तर मोबाईल आणि बॅग नदीपात्रात सापडली होती. त्यामुळे बेपत्ता तरुणाबाबत अनेक तर्क- वितर्क व्यक्त करण्यात येत होते.
पाण्यात बुडाला असल्याचा संशय व्यक्त करत तज्ञ रेस्क्यू टीम आणि पाण्यातील वस्तूंचा शोध घेणाऱ्या अत्याधुनिक वॉटरप्रूफ कॅमेऱ्यांच्या मदतीने मलप्रभा नदी पात्रात त्याचा तब्बल चार किलोमीटरपर्यंत शोध घेण्यात आला. पण हाती काहीच लागले नव्हते. परिणामी, तो नदीत बुडाला नसल्याचे स्पष्ट झाल्याने तो जिवंत असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला होता. डीएसपी रवी नाईक आणि पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांना तपासादरम्यान संपतकुमार याने महिनाभरापूर्वी नवीन सिमकार्ड घेतले होते अशी माहिती मिळाली. या सिम कार्डचा नंबर मिळवून जिल्हा पोलीस मुख्यालयातील तांत्रिक विभागाच्या मदतीने लोकेशन शोधण्यात आले. या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तेलंगणाच्या आदिलाबाद येथील असल्याचे दिसून आले.
नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक किरण सत्तीगेरी, कित्तूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, हवालदार शिवकुमार तुरमंदी, जिल्हा पोलीस मुख्यालयातील टेक्निकल सेलचे विनोद ठक्कणवर यांचे पथक नेमण्यात आले. हे पथक तेलंगणाला गेले आणि या पथकाने संपतकुमारचा ठाव ठिकाण शोधण्यात यश आले.
यानंतर संपतकुमारला घेऊन सोमवारी (दि.१ ऑक्टोबर) रात्री हे पथक खानापूरच्या दिशेने रवाना झाले आहे. तो तेलंगणा येथे कसा पोहोचला? तसेच त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता का? याबाबतची माहिती संपतकुमार खानापूरला पोहोचल्यानंतर समजणार आहे.
हेही वाचा :