Pt. Hridaynath Mangeshkar : पं. हृदयनाथांची दाद नेहमीच प्रेरणा देणारी; ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे यांची भावना | पुढारी

Pt. Hridaynath Mangeshkar : पं. हृदयनाथांची दाद नेहमीच प्रेरणा देणारी; ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे यांची भावना

पुणे; पुढारी वृत्तसेवा  : पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी मला जेवढे स्वत:चे गाणे ऐकवले आहे, त्यापेक्षाही जास्त माझे गाणे त्यांनी ऐकले आहे. माझ्या स्वत:च्या आणि मी गोळा केलेल्या बंदिशींमध्ये त्यांनी नेहमीच औत्सुक्य दाखविले आहे. दिलफेक दाद दिली आहे. प्रतिक्रिया म्हणून स्वत:च्या दुर्मीळ बंदिशी ऐकवल्या आहेत. त्यांच्या दाद देण्यातून, त्यांच्या आवडीनिवडीतून त्यांची सौंदर्यदृष्टी मला समजून घेता आली. हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळेच माझी संगीताची समज प्रगल्भ झाली, अशी भावना ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केली.

दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त या वर्षापासून ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला पहिला ‘लतादीदी’ पुरस्कार पं. देशपांडे यांना भारती हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी लता मंगेशकर यांच्या अंतिम इच्छेनुसार मंगेशकर कुटुंबीयांतर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कृतज्ञता निधीचा धनादेश रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्त केला.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याविषयी बोलताना पं. देशपांडे म्हणाले की, पं. हृदयनाथ मंगेशकरांनी अनेक कवींच्या कविता जनमानसात लोकप्रिय केल्या. तसेच हृदयनाथांच्या संगीतक्षेत्रातील समर्पणाने अनेक पाश्चात्त्य वाद्यांना भारतीय चेहरा प्राप्त करून दिला. त्यांचे हे योगदान अतुलनीय आहे. कार्यक्रमानिमित्त ‘असेन मी नसेन मी’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला.

हेही वाचा

Sai Paranjpye : सई परांजपे पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत

पुणे : रस्त्यांवरील मंडपांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा

Asian Games 2023: ओजस, अभिषेकचा अचूक वेध; तिरंदाजीत भारताचे पदक निश्चित

Back to top button