

पुणे : ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे या पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत रसिकांसमोर येणार आहेत. त्यांचेच लेखन आणि दिग्दर्शक असलेले लवकरच नवे नाटक रंगभूमीवर येत असून, इवलेसे रोप असे नाटकाचे नाव असून, दसर्याला नाटकाचा मुहूर्त होत असणार आहे. या नाटकामध्ये मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या प्रमुख भूमिका असतील, असे सई परांजपे यांनी सांगितले.
मुंबई दूरदर्शनच्या (डीडी-सह्याद्री) 51 व्या वर्धापनदिनानिमित्त दूरदर्शनच्या पहिल्या कार्यक्रम निर्मित्यांपैकी एक असलेल्या सई परांजपे या आता 15 ऑक्टोबरपासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कथा सईची या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत परांजपे बोलत होत्या. यानिमित्ताने परांजपे यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना नाटकाचे दिग्दर्शन करत असल्याची घोषणा केली.
मी दिग्दर्शित करत असलेले नाटक वयाची ऐंशी पार केलेल्या दाम्पत्याची कथा असलेले हे नाटक म्हणजे 'ब्लॅक कॉमेडी' आहे. दिग्दर्शक म्हणून मला ओळखत असले तरी मी मूळची लेखक आहे. माझे बरेचसे लेखन अद्याप अप्रकाशित आहे. त्यामध्ये अनेक पटकथा आणि नाटकाचे लेखन आहे. त्यामुळे अद्याप प्रकाशात न आलेले लेखन हे नाट्यसंहितेच्या माध्यमातून रसिकांसमोर येत आहे. सध्या तरी 'इवलेसे रोप' असे या नाटकाचे नाव ठेवले आहे. कदाचित ते बदलूही शकेल. मी लिहिलेले नाटक मीच दिग्दर्शित करत आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कितीही काम केले तरी रंगभूमीची मजा काही औरच आहे, अशी भावना परांजपे यांनी व्यक्त केली.
दूरदर्शनच्या 51 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने सोमवारपासून (2 ऑक्टोबर) प्रेक्षकांसाठी चार नवे कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुंबई ग्राहक पंचायतच्या सहकार्याने 'जागो ग्राहक' हा साप्ताहिक कार्यक्रम आणि 'गोष्टी गाण्याच्या' हा कार्यक्रमांचा समावेश आहे. 'कथा सईची' या 15 ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी नऊ वाजता प्रसारित होणार्या कार्यक्रमातून चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्या सई परांजपे आपल्या अनोख्या प्रवासाबाबत कार्यक्रमात संवाद साधणार आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशातून नोव्हेंबरपासून विज्ञानविषयक कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. याखेरीज कोरोना काळात काही कारणास्तव बंद राहिलेल्या 'सिंधू धारा' आणि क्रीडांगण हे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रम विभागाचे प्रमुख संदीप सूद यांनी दिली.
हेही वाचा