पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव संपल्यानंतर दोन दिवसांच्या मुदतीच्या आत रस्त्यांवरील मांडव, स्वागत कमानी आणि विसर्जन मिरवणुकीसाठी वापरलेले साहित्य काढून न घेणार्या मंडळांवर अखेर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील तब्बल 22 मंडळांचे मंडप साहित्य महापालिकेकडून स्वत: उतरवून त्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर, अद्यापही जाहिरात फलक तसेच कमानी उभ्या असलेल्या मंडळांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
महापालिकेकडून परवानगीनुसार शहरातील जवळपास 2 हजार 905 सार्वजनिक गणेश मंडळांनी या वर्षी मंडप उभारले होते. मागील वर्षीच पाच वर्षांसाठीचे हे परवाने देण्यात आले आहेत. मंडप टाकण्यासाठी परवानगी देताना त्यासाठी काही अटी व शर्ती पालिकेकडून घालून देण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर मंडप टाकणे आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेणे तसेच गणेशोत्सव संपल्यानंतर 48 तासांच्या आत मांडव आणि स्वागत कमानी काढून घेण्यात यावी, अशा काही अटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यासंबंधीचे हमीपत्रही मंडळांनी भरून दिलेले आहे.
मात्र, विसर्जन झाल्यानंतर तीन दिवस उलटल्यानंतरही शहरात अनेक मंडळांचे मंडप तसेच मिरवणुकीचे रथ रस्त्यावरच असल्याचे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मुख्य मांडव आणि जाहिरातींच्या रनिंग मांडवाचेही खांब तसेच असून, त्यामुळे पडलेले खड्डे प्रशासनास दुरुस्त करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळीच रस्त्यांवर अडथळे ठरणार्या मंडपांवर कारवाई सुरू केली. सोमवारी दिवसभरात शहराच्या वेगवेगळ्या भागांत करण्यात आलेल्या कारवाईत 22 मंडपांचे साहित्य पालिकेने जप्त केल्याचे अतिक्रमण विभागप्रमुख जगताप यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची कारवाई सुरू होताच अनेक मंडळांनी मांडव हटविण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ज्या मंडळांच्या बाहेर अथवा परिसरात अद्यापही जाहिराती असतील तर त्या काढले जाणार असून, त्यांच्याकडून अनधिकृत जाहिरातीचा दंडही आकारण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच मंडपांमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी 7 ऑक्टोबरची मुदत देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा