

देवळाली कॅम्प, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक तालुक्यातील नानेगाव परिसरात दहशत माजवणारा बिबट्या आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सकाळपासूनच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
दारणा नदी काठाच्या गावांमध्ये बिबट्याचे वास्तव्य नित्याचे झाले असल्याने नानेगाव, शेवगेदारणा, राहुरी, दोनवाडे, दहावी लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, बेलदगव्हाण, पळसे, देवळाली कॅम्प, भगूर, वडनेर दुमाला परिसरातही बिबट्याचा वावर वाढला आहे. काल, दि. 2 ऑक्टोबर रोजी लांब रोड भागातील बालगृह रोडवर बिबट्या बांधकाम साइटवरील शेडमध्ये दिसून आला. तर वडनेर दुमाला येथे भरत पोरजे यांच्या पेरूच्या बागेतही बिबट्याचे दर्शन घडले. गावकर्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच या ठिकाणी वन विभागाने काल रात्री पिंजरा लावला. तर आज, दि. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नानेगाव येथील भवानी नगर परिसरातील मनाजी शिंदे यांच्या शेतातील घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. त्याने फोडलेल्या डरकाळीमुळे परिसर जागा झाला. त्याला बघण्यासाठी गर्दी करीत आहेत. गावकऱ्यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिलेली आहे.
यापूर्वी देखील या ठिकाणी तीन वेळा बिबट्या जेरबंद झालेला आहे. ऊसाची शेती तसेच गवत यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असल्याकारणाने या परिसरातील त्याचे वास्तव्य हे कायमचे झाले आहे. आज जरी बिबट्या जेरबंद झाला असला तरी पुन्हा येणार नाही याची खात्री या परिसरातील नागरिकांना नसल्याने. "आम्हा शेतकऱ्यांचे जीवन हे नेहमीच बिबट्याच्या भयाखाली असते" अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी पुढारी प्रतिनिधीशी बोलताना दिली.