जेवढी लोकसंख्या, तेवढा हक्क दिलाच पाहिजे : राहुल गांधी | पुढारी

जेवढी लोकसंख्या, तेवढा हक्क दिलाच पाहिजे : राहुल गांधी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  बिहार सरकारने जातनिहाय जनगणनेचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राजकीय टीका-टिपणी सुरू झाली असून, राहुल गांधी यांनी या जनगणना अहवालाचे समर्थन केले आहे. देशभरात जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

‘एक्स’ अर्थात आधीच्या ट्विटरवर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, त्यात म्हटले आहे की, बिहारच्या जनगणनेनुसार तेथे ओबीसी, एससी आणि एसटी यांची एकत्रित लोकसंख्या 84 टक्के आहे. केंद्र सरकारच्या 90 सचिवांपैकी अवघे 3 ओबीसी आहेत, ते भारताचे फक्त 5 टक्के बजेट हाताळतात. त्यामुळेच संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्याचे आकडे जाहीर केले पाहिजेत. जेवढी लोकसंख्या, तेवढा हक्क हा आमचा निर्धार आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सामाजिक सबलीकरण योजना मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाची कल्पना पुढे नेण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. बिहारने केलेली ही जातगणना योग्यच असून, देशभरात याच प्रकारे जातनिहाय जनगणना करायला हवी, असे ते म्हणाले.

Back to top button