Crime news : तो खून प्रेयसीकरवीच ! प्रियकरासोबत कट रचत काढला काटा | पुढारी

Crime news : तो खून प्रेयसीकरवीच ! प्रियकरासोबत कट रचत काढला काटा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून तसेच नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने लाईन बॉय असलेल्या पहिल्या प्रियकराचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सिंहगड रोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 36 तासांत प्रेयसीसह चौघांना बेड्या ठोकल्या. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विजय वसंत ढुमे (वय 48) याच्या खूनप्रकरणी सुजाता समीर ढमाल (रा. किरकटवाडी), संदीप दशरथ तुपे (वय 27 रा. कांदलगाव, ता.इंदापूर, पुणे), सागर संजय तुपसुंदर (वय 19 रा.सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (वय 28 रा. उंड्री पिसोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

संदीप तुपे याच्यावर विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर 29 सप्टेंबरला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास टोळक्याने ढुमे याचा सळईने मारहाण करीत खून केला होता. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून ही कारवाई केली गेली.

संबंधित बातम्या : 

चार महिन्यांपूर्वी तुपेबरोबर जुळले सूत
लाईन बॉय असलेल्या ढुमेचा पोलिस दलातील काही जणांसोबत तसेच शहरातील गुन्हेगारांसोबत मिरविण्याचा छंद होता. गेल्या 13 वर्षांपासून ढुमे हा ढमालबरोबर प्रेमसंबंधात होता. तिचा विवाह झाला असून, तिचा पती हाऊस किपिंगची कामे करतो. तिला बाउंसरची नोकरी करायची होती. त्या दृष्टीने तिच्या हालचाली सुरू होत्या. चार महिन्यांपूर्वी तिचे तुपे याच्या सोबत इन्स्ट्राग्रामवरून सूत जुळले होते. ढुमेच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने नवा प्रियकर तुपे याच्यासोबत ढुमेच्या खुनाचा कट रचला. त्यातूनच हा खून घडवून आणल्याचे पुढे आले आहे.

गुन्ह्याचा शोध घेण्यात येत होता. परिसरातील 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांची नावे निश्चित केली. त्यामध्ये ढमाल ही ढुमेच्या व त्याच बरोबर तुपेच्या वारंवार संपर्कात असल्याचे आढळले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ढुमे याचे ढमाल हिच्यासोबत प्रेमसंबंध होते असे उघडकीस आले. पथकाने केलेल्या तपासात तिने नवीन प्रियकर तुपे याच्या मदतीने ढुमेला संपविण्याचा कट रचल्याचा संशय बळावला. पुढे पोलिसांचा संशय खरा ठरला. दोघांनीही इतर साथीदारांच्या मदतीने ढुमेच्या खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उतेकर, सतीश नागुल, सुनील चिखले, संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, स्वप्नील मगर, दक्ष पाटील यांच्या पथकाने याप्रकरणी कारवाई केली.

नवीन प्रेमसंबंधात ढुमे हा अडथळा ठरत असल्यामुळे सुजाताने दुसरा प्रियकर तुपे याच्या मदतीने त्याला संपविण्याचा डाव रचला होता. 29 सप्टेंबरला ढुमेचा टोळक्याने लोखंडी सळईने वार करून खून केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.
            – अभय महाजन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस ठाणे.

Back to top button