धक्कादायक ! कैदी ससूनमधून चालवत होता ड्रग रॅकेट ; मेफेड्रॉन जप्त

धक्कादायक ! कैदी ससूनमधून चालवत होता ड्रग रॅकेट ; मेफेड्रॉन जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कारागृहातील सापडणारे फोन, चिठ्ठीद्वारे आपल्या साथीदारांना दिले जाणारे संदेश, यांसारखे प्रकार समोर आले असतानाच आता कारागृहातून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. त्यांनी 2 कोटी 14 लाखांचे मेफेड्रॉन जप्त करीत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. कारागृहात एकत्र असताना झालेल्या ओळखीतून हा अमली पदार्थ तस्करीचा गोरख धंदा सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सुभाष जानकी मंडल (वय 29, दरखंड) आणि रौफ रहिम शेख (वय 19, रा. ताडीवाला रस्ता) यांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे.

मुख्य आरोपी कैदी ललित अनिल पाटील (वय 34) याला नोटीस पाठवण्यात आली आहे. ललित पाटील याला चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याचा साथीदार सुभाष मंडल याला राजगड पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. कारागृहात झालेल्या ओळखीतून दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. जून महिन्यापासून ललित पाटील हा टीबी आणि अल्सरच्या आजारांसाठी ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला होता. तत्पूर्वी, जानेवारी महिन्यात सुभाष मंडल कारागृहातून बाहेर आला होता.

संबंधित बातम्या : 

कारागृहात झालेल्या ओळखीचा फायदा घेत मंडल हा पाटील याच्याबरोबर सातत्याने संपर्कात होता. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे हे पथकासह पुणे स्टेशन परिसरात शनिवारी गस्तीवर होते. या वेळी एक व्यक्ती ससून हॉस्पिटल परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळाली. दरम्यान, ससून हॉस्पिटलसमोर बस स्टॉपलगत सुभाष मंडल हा बॅगसह थांबलेला दिसला.

त्याची झडती घेतली असता 1 किलो 71 ग्रॅम 53 मिलिग्राम मेफेड्रोन पदार्थ आढळला. त्याची चौकशी केली असता हा अमली पदार्थ ससून हॉस्पिटल वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचारांसाठी येरवडा कारागृहातील दाखल असलेला कैदी ललित पाटील याने ससून हॉस्पिटल कॅन्टीन कामगार रौफ शेख याच्याकरवी विक्रीसाठी पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पकडण्यात आलेल्या मेफेड्रॉनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 2 कोटी 14 लाख 30 हजार रुपये आहे. पोलिसांनी चार फोन जप्त केले असून, त्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त (गुन्हे) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलिस अंमलदार चेतन गायकवाड, सहायक पोलिस फौजदार शिवाजी घुले, संतोष देशपांडे, संदीप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, अजीम शेख, युवराज कांबळे यांनी केली.

कारागृहात राहूनदेखील सक्रिय
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हेगार कारागृहात राहूनदेखील सक्रिय असल्याचे यानिमित्त समोर आले आहे. पाटील याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ते मोबाईल त्याला कोणी पुरविले. दरम्यानच्या काळात त्याने कोणाला संपर्क साधला, याचाही सध्या तपास सुरू आहे. त्याचबरोबर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कोठून तस्करी केले? त्यांनी शहरात ते अमली पदार्थ कोणाला देणार होते? असे सर्व प्रश्न यानिमित्त उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणारे कारागृहातील बंदी खरोखरच आजारी असतात का? याचीही कठोर चौकशी झाली पाहिजे, असाही मुद्दा चर्चेला आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news