Pune News : नाले बुजविण्याचे ‘उद्योग’ लोहगाव-वाघोली परिसरात प्लॉटिंगचे पेव | पुढारी

Pune News : नाले बुजविण्याचे ‘उद्योग’ लोहगाव-वाघोली परिसरात प्लॉटिंगचे पेव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे एकीकडे शहरात थेट रस्त्यावरून पुराच्या पाण्याचे लोंढे वाहण्याचे प्रकार घडत असताना लोहगाव-वाघोली परिसरात नाले बुजविण्याचे उद्योग जोरात सुरू आहेत. काही ठिकाणी थेट नाल्यात भराव टाकून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांची फसवणूक होणार आहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावरील सर्व्हे नंबर 62/2 या ठिकाणी प्लॉटिंग सुरू आहे. एका ठिकाणी असलेल्या जनार्दननगरजवळ नाला वाहतो. या नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी आमदार निधीतून रस्त्यावर कलव्हर्ट बांधण्यात आला आहे. याच नाल्याच्या प्रवाहाच्या समोरून नाला वाहत असलेल्या ठिकाणी म्हणजेच स. न. 62/2 मध्ये थेट नाल्यावर मोठी सिमेंटची भिंत घालून पाण्याचा प्रवाह अडविण्याचा प्रयत्न केला आहे. नाल्याचा प्रवाह बदलून नाल्याची जागा विकसित करीत त्यावर प्लॉटिंग केले आहे. विशेष म्हणजे हा शेती झोन आहे. असे असताना लाखो रुपयांनी प्रतिगुंठा दराने जागा विकण्याचे उद्योग सुरू आहेत.

एकीकडे गत आठवड्यात ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी सिंहगड रस्ता आणि कोथरूड परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांना पूर आला होता. कोथरूड परिसरात सोसायट्या, दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले होते. धानोरी भागात सलग दोन वर्षे अशीच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नाल्यांवरील अतिक्रमण आणि त्यांचे प्रवाह बदलण्याच्या उद्योगांमुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. असे असताना उपनगरांमध्ये बिनधिक्कतपणे नाल्यांवर प्लॉटिंग आणि अतिक्रमणे सुरूच आहेत. सर्वसामान्य नागरिकांची नाल्यात जागा घेऊन घर बांधल्यास पावसाळ्यात पूर परिस्थती निर्माण होऊन फसगत होण्याची शक्यता आहे. अंतर्गत सिमेंट रस्ते तयार करून ती शिल्लक राहिलेल्या नाल्यातच सोडण्यात आलेली आहेत. महापालिका प्रशासनाने वेळीच हे बेकायदा प्लॉटिंग थांबवून नागरिकांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button