देवेगौडा यांच्या भाजप युतीला महाराष्ट्रातून विरोध

देवेगौडा यांच्या भाजप युतीला महाराष्ट्रातून विरोध

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमध्ये त्यांच्या जनता दलाची (धर्मनिरपेक्ष) भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद त्यांच्या पक्षाच्या अन्य राज्यांतील शाखांमध्ये पडू लागला आहे. महाराष्ट्रातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी या निर्णयाला ठाम विरोध करण्याची भूमिका जाहीर केली. महाराष्ट्रातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील राज्य पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व निमंत्रित यांची राज्यस्तरीय बैठक पुण्यात शनिवारी झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

जनता दलाचे माजी आमदार गंगाधर पटणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र जनता दलाने सातत्याने धर्माधिष्ठित राजकारणाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. त्यामुळे देवेगौडा यांच्या भाजपशी युतीच्या निर्णयाचा ठाम विरोध व निषेध करण्याचे ठरले. महाराष्ट्र जनता दल अशा कोणत्याही युतीत वा निर्णयात सहभागी होणार नसल्याची ठाम भूमिका या वेळी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर या युतीच्या विरोधी भूमिकेतून जनता दलाच्या विविध राज्य संघटनांनी सामूहिक विचार प्रक्रिया सुरू केलेली आहे.

त्यामध्येही सहभागी होण्याचे या वेळी ठरले. राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांची पुढील वाटचाल एकत्रित व एकसंध व्हावी, यासाठी अन्य समविचारी पक्षांपैकी योग्य पर्याय निश्चित करण्यासाठी समान विचारसरणी असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व अन्य पर्यायासंदर्भात संबंधित पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व नेते यांच्याशी समक्ष चर्चा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी बैठकीत नियुक्त केलेली समिती बी. जी. कोळसे पाटील यांच्या सहकार्याने आवश्यक त्या सर्व पक्षनेत्यांशी व संबंधितांशी चर्चा करून जो निर्णय घेईल, त्यामध्ये सहभागी होण्याचा व पुढील वाटचाल करण्याचा निर्णयही जनता दलाच्या या सभेत एकमताने घेण्यात आला.
सुरुवातीस डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीमध्ये श्रीमती साजिदा निहाल अहमद, प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, शिवाजी परुळेकर, रेवण भोसले, डॉ. विलास सुरकर, सलीम भाटी, नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, दत्तात्रय पाकिरे, विद्याधर ठाकूर, प्रभाकर नारकर आदींनी चर्चेत भाग घेतला. विठ्ठल सातव यांनी स्वागत केले. डॉ. पी. डी. जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news